डीजीपी रश्मि शुक्ले यांची बदली, महाविकास आघाडीच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाचा निर्णय

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Nov 04, 2024

मुंबई: महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) रश्मि शुक्ले यांची अखेर बदली करण्यात आली आहे. रश्मि शुक्ले यांच्यावर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप असल्याने महाविकास आघाडीने (एमव्हीए), विशेषत: काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना हटवण्याची मागणी केली होती. यानुसार, निवडणूक आयोगाने त्यांच्या बदलीचे आदेश जारी केले असून, राज्याच्या मुख्य सचिवांना वरिष्ठता पाहून त्यांच्या जागी अन्य वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्य सचिवांना येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत तीन आयपीएस अधिकाऱ्यांचा पॅनेल पाठवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून डीजीपी पदावर नवी नियुक्ती करता येईल. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचे महत्त्व लक्षात घेऊन सर्व अधिकाऱ्यांना योग्यप्रकारे जबाबदारी पार पाडण्याचे आदेश दिले आहेत.

फोन टॅपिंगचे आरोप:

२०१४ आणि २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात रश्मि शुक्ले या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी एकनाथ खडसे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय राऊत यांच्यासह काही विरोधी नेत्यांचे फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात पुणे आणि मुंबईतील कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी शुक्ले यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. फडणवीस यांनी रश्मि शुक्ले यांनी दिलेल्या एका पत्राच्या आधारे पोलिसांवरील बदलीतील भ्रष्टाचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरून हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयातही पोहोचले होते.