
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई :महापे ते शिळफाटा रस्त्यालगत असलेल्या संरक्षित वनक्षेत्रात शनिवारी सकाळी दरड कोसळून वाहतूक काही काळ ठप्प झाली. दरड कोसळल्यामुळे रस्त्यावर माती व दगडांचा ढिगारा साचला होता. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरड कोसळल्याची माहिती मिळताच वन विभागाचे कळवा येथील परिमंडळ कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक व जवान, स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी तसेच वन मजूर तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक शीळ गावातील नागरिकांनीही प्रशासनाला तातडीने मदत केली. दोन जेसीबींच्या साहाय्याने रस्त्यावरील माती व दगड हटवण्यात आले. सुमारे दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
दरड कोसळण्याच्या या घटनेमुळे महामार्गावरील वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. तथापि, स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले.