
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
मध्यरात्री गस्तीमध्ये केमिकल टँकर जप्त
नवी मुंबई | दिघा प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai municipal Corporation ) क्षेत्रातील दिघा ( Digha )विभागात गेल्या काही दिवसांपासून केमिकलचा उग्र वास जाणवत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. ग्रीन वर्ल्ड सोसायटी व रामनगर परिसरातील नागरिकांनी ७ ऑगस्टपासून यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ऐरोली अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या तपास सुरू केला होता.
परिसरातील नाल्यात अज्ञात व्यक्तींकडून हानिकारक रसायन सोडले जात असल्याचा संशय निर्माण झाला होता. या संदर्भात ग्रीन वर्ल्ड सोसायटीसमोरील नाल्यातील पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. दरम्यान, महापालिका व पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी सतत गस्त घालण्यास सुरुवात केली होती.
११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १ वाजता, दिघा स्टेशनसमोरील मुकुंद कंपनीच्या गेटजवळ उभ्या असलेल्या एका संशयित टँकरची तपासणी करण्यात आली. तपासणीत या टँकरमध्ये तीव्र दुर्गंधीयुक्त केमिकल असल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री. सचिन आडकर, श्री. देसाई आणि श्री. देशमुख यांनी लिटमस पेपरच्या साहाय्याने त्याची तपासणी केली असता, हे रसायन अत्यंत हानिकारक असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत तात्काळ 112 हेल्पलाइनवर तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलीस बीट मार्शल आणि विभागाचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेचे सहायक आयुक्त श्री. नैनेश बदले, कनिष्ठ अभियंता श्री. अजिंक्य पाटील आणि प्रदूषण मंडळाचे अधिकारी यांनी घटनास्थळी पंचनामा केला. ग्रीन वर्ल्ड सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची आणि रहिवाशांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
सदर टँकरमधील केमिकलचे नमुने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.