माथेरानमध्ये हातरिक्षा चालकाचा दुर्दैवी मृत्यू: ई-रिक्षा परवानगीसाठी मागणी

  • Admin
  • नवी मुंबई
  • Oct 31, 2024

मिलिंद कदम

माथेरान।माथेरान येथे ब्रिटिश काळापासून अंतर्गत वाहतुकीसाठी हातरिक्षाचा वापर केला जातो. परंतु, रिक्षा चालवताना चालकांना गंभीर शारीरिक ताणाचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येते. आज सकाळी, परशुराम उर्फ कालुराम पिरकट (वय 45), जो गेल्या 15 वर्षांपासून हातरिक्षा चालवून उपजीविका करत होता, हॉटेल शालिमार जवळ रिक्षा ओढताना दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे माथेरानमधील हातरिक्षा चालकांच्या समस्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

माथेरानमध्ये ई-रिक्षा परवानगी मिळावी, या मागणीसाठी श्रमिक रिक्षा संघटनेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिक स्वरूपात सात ई-रिक्षांना परवानगी दिली होती आणि यानंतर आणखी 13 ई-रिक्षांना मंजूरी देण्यात आली. पावसाळ्यात ई-रिक्षा कशा चालतात, याचा अहवाल न्यायालयाला सादर करण्याची सूचनाही दिली होती. तथापि, अजूनही उर्वरित रिक्षांना परवानगी न मिळाल्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा चालू आहे.श्रमिक रिक्षा संघटनेच्या उपाध्यक्ष प्रकाश सुतार यांनी लवकरात लवकर उर्वरित 74 हातरिक्षा चालकांना ई-रिक्षा परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, ही अत्यंत कष्टप्रद कामे करणाऱ्या रिक्षा चालकांना कायमस्वरूपी ई-रिक्षा परवानगी देऊन त्यांच्या आयुष्यात सुधारणा घडवावी, अन्यथा अशा दुर्दैवी घटनांचा सिलसिला थांबणारना नाही.