NMMC अपूर्ण कामाचे पूर्ण बिल देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अभियंतांवर निलंबनाची कारवाई

  • Admin
  • नवी मुंबई
  • Nov 26, 2024

नवी मुंबई - नेरूळ येथील सायकल ट्रॅक बनवण्याचे काम अपूर्ण असताना त्या कामाचे ठेकेदाराला पूर्ण बिल देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ही कारवाई केली. 

उपअभियंता किशोर अमरनानी आणि कनिष्ठ अभियंता विनोद जैन अशी या अभियंत्यांची नावे आहेत. 'बी' विभाग कार्यालय, नेरुळ येथे हे कार्यरत आहेत. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ११ कोटी रुपये खर्चाच्या या कामाचे अंतिम देयक ५ कोटी रुपये इतके होते.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पामबीच मार्गालगत सायकल ट्रॅक बनवणे आणि परिसराचे सुशोभिकरण करण्याचे काम चालू आहे. विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच हे काम विविध कारणामुळे वादाच्या भौऱ्यात सापडले होते. अशा स्थितीतही हे 

काम अपूर्ण असतानाही, संबंधित कंत्राटदारास या कामाचे अंतिम देयक अदायगीसाठी (देण्यासाठी)

सादर करण्याचा ठपका या अभियंत्यांवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशीअंति यासंदर्भात वास्तुविशारद यांनी कामातील अपूर्ण गोष्टींचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला. या प्रकरणी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीसी बजावली होती. त्याला अनुसरून सादर केलेला खुलासा असमाधानकारक असल्याने संबंधितांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.