रबाळेत गोदामाला भीषण आग; बाजूच्या इमारतीचेही नुकसान

  • Admin
  • नवी मुंबई
  • Dec 12, 2024

नवी मुंबई। रबाळे येथील एका गोदामाला गुरुवारी सकाळी सुमारे साडेपाच वाजता भीषण आग लागली. या आगीत गोदाम पूर्णतः जळून खाक झाले असून, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला दीड तास झगडावे लागले. आगीच्या तीव्रतेमुळे शेजारील इमारतीलाही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.आगीची सुरुवात नेमकी कशामुळे झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आगीच्या ज्वाळांमुळे शेजारील इमारतीच्या पाचव्या मजल्यापर्यंतच्या काचा वितळल्या किंवा फुटल्या आहेत.सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही.

अवैध गोदामांवर प्रश्नचिन्ह

या दुर्घटनेमुळे रबाळे परिसरातील अवैध गोदामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अनेक गोदामांकडे अग्निसुरक्षेसाठी आवश्यक असलेली फायर एनओसी नसल्याचे उघड झाले आहे.स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला असून, या गोदामांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अग्निशमन दलाची कार्यवाही

अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी शेजारील इमारतींमध्ये आग पसरू नये याची काळजी घेतली.

प्रशासनाकडून तपास सुरू

या घटनेची चौकशी सुरू असून, संबंधित गोदामाच्या मालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. स्थानिक पातळीवर या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना राबवण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.