गणेश नाईक यांची देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Dec 15, 2024

मुंबई।महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या अनुभवसंपन्न राजकीय प्रवासामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण आहे.

गणेश नाईक यांनी यापूर्वी पर्यावरण मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री, कामगार मंत्री, अपारंपरिक ऊर्जा मंत्री तसेच १५ वर्ष ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ठाणे जिल्ह्यातील विकासकामांसोबतच जनतेशी थेट संवाद साधत 2,000 हून अधिक ‘जनता दरबार’ भरवून समस्यांचे निवारण केले आहे. महाराष्ट्रातील असे काम करणारे ते एकमेव पालकमंत्री ठरले आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका स्थापनेपासून नवी मुंबईकरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत महापालिकेची सत्ता सातत्याने त्यांच्या नेतृत्वाखाली राखली आहे. शहराच्या विकासात त्यांनी घेतलेली पुढाकार आणि त्यांच्या नेतृत्वातील यशस्वी कारभार यामुळे त्यांना जनतेचा पाठिंबा मिळाला आहे.

आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात प्रवेश मिळाल्यानंतर, नाईक यांच्याकडे कोणते खाते सोपवले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विकास साधण्यासाठी ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गणेश नाईक यांचे प्रमुख योगदान:

१५ वर्ष ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्य.

2,000 पेक्षा जास्त जनता दरबार भरवले.

पर्यावरण, कामगार, अपारंपरिक ऊर्जा, आणि राज्य उत्पादन शुल्क खात्यांचे यशस्वी नेतृत्व.

नवी मुंबई महानगरपालिकेवर सातत्याने सत्ता राखण्याचे नेतृत्व.

गणेश नाईक यांच्या या नवीन जबाबदारीसाठी अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, राज्याच्या राजकारणात त्यांचा अनुभव आणि योगदान आगामी काळात फडणवीस सरकारसाठी अत्यंत मोलाचे ठरेल, असे मत

व्यक्त केले जात आहे.