मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीस नवी मुंबई महानगरपालिकेकडून सुरुवात

  • Admin
  • नवी मुंबई
  • Jan 14, 2025

नवी मुंबई नागरिकांचे जीवन सुखकर होण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणा-या सेवा गुणवत्तापूर्ण व जलद असाव्यात या दृष्टीने सर्व विभागांनी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम हाती घ्यावा व मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखडयाची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिलेले आहेत.

      याबाबत प्रभावी कार्यवाही करण्याच्या दृष्टीने सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत आयुक्तांनी सर्वप्रथम कार्यालयांच्या स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देशित केले. या अनुषंगाने कार्यालय मधील जुन्या व निरुपयोगी साहित्याची विहीत कार्यपध्दतीने विल्हेवाट लावणे, कार्यालय व परिसराची सखोल स्वच्छता करणे, आवश्यकतेनुसार सुधारणा करणे तसेच प्रचलित नियम, कार्यपध्दतीप्रमाणे कागदपत्रांचे व नस्तींचे अ,ब,क,ड पध्दतीने वर्गीकरण करणे, ड वर्गातील कालावधी पूर्ण झालेली कागदपत्रे नष्‍टीकरण व निर्लेखनाची प्रक्रिया सर्व विभागांनी आपल्या कार्यालयात प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश दिले.

      त्याचबरोबर कार्यालयामधील कर्मचारी व त्याठिकाणी येणारे अभ्यागत यांच्याकरिता पिण्याच्या स्वच्छ व शुध्द पाण्याची योग्य व कायमस्वरुपी व्यवस्था करणे, कर्मचारी व अभ्यागत यांना स्वच्छ व नीटनेटकी प्रसाधनगृहे उपलब्ध करुन देणे, अभ्यागतांसाठी सुसज्ज प्रतिक्षालय करणे, सुव्यवस्थित नामफलक व दिशादर्शक फलक लावणे आदी कार्यवाही करण्याचे आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले.

      नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ माहितीने परिपूर्ण व अद्ययावत असावे, नागरिकांना वापरण्यास सुलभ असावे असे निर्देशित करतानाच नागरिकांना आवश्यक असलेल्या सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन द्याव्यात व संकेतस्थळ सुसंवादी असावे असे स्पष्ट निेर्देश आयुक्तांनी दिले. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदींनुसार जास्तीत जास्त माहितीचे स्वयंप्रकटीकरण करण्यात यावे तसेच लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील तरतुदींनुसार महानगरपालिका पुरवित असलेल्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध असतील व त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही यादृष्टीने कायमस्वरुपी आढावा घेतला जावा असेही आयुक्तांनी निर्देशित केले.

      नागरिकांकडून प्राप्त होणा-या तक्रारींच्या निराकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची तक्रार निवारण प्रणाली (Grievance Redressal System) कार्यक्षमतेने कार्यरत आहे याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत विविध माध्यमातून पोहचवावी तसेच या तक्रारींचे त्वरेणे निराकरण करुन प्रलंबितता शून्य राहिल याची प्रत्येक विभागाने दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

      नागरिकांशी नियमित संपर्क राखण्याच्या दृष्टीने सर्व अधिका-यांनी कार्यालयात अभ्यागतांच्या भेटीसाठी ठराविक दिवशी दुपारी 2 ते 5 हा वेळ राखून ठेवावा व तसा फलक कार्यालयात दर्शनी भागात प्रदर्शित करावा. त्याचप्रमाणे यावेळी दौ-यावर असल्यास भेट देण्यासाठी अन्य अधिका-याची नेमणूक करावी असेही निर्देशित केले.

      महापालिका स्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी ज्याप्रमाणी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते ते अधिक प्रभावीपणे करण्यात यावे. त्याचप्रमाणे क्षेत्रीय स्तरावर नागरिकांकडून मांडले जाणारे प्रश्न, समस्या यांचे तत्परतेने निराकरण करण्यात यावे व त्याची माहिती संबधित नागरिकांना कळविण्याची दक्षता घ्यावी अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

      कार्यालयात नागरिकांना भेटण्याप्रमाणेच विभागप्रमुख अधिका-यांनी आठवडयातील किमान 2 दिवस आपल्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांनी भेटी देउुन पाहणी करावी व तेथील कामकाजात सुधारणा करण्याच्या दृष्टीने सूचना द्याव्यात व त्यांच्या पूर्ततेचा आढावा घ्यावा असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. विशेषत्वाने शाळा, रुग्णालये, आरोग्य केंद्रे, समाज मंदिरे, मार्केट, शौचालये अशा विविध सुविधांच्या ठिकाणी नियमित भेटी देउुन तेथील कामकाज लोकोपयोगी राहिल याबाबत काळजी घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.

      नागरिकांचे जीवन सुखकर करण्यास (Ease of Living) सर्वाधिक प्राधान्य देउुन कामकाज करणे हा आपल्या मुलभूत कर्तव्याचा भाग असून त्यासाठी सर्व विभागांनी आपल्या स्तरावर काटेकोर नियोजन करावे व प्रशासन लोकाभिमुख काम करीत असल्याचा विश्वास नागरिकांच्या मनात निर्माण होईल अशाप्रकारे कामकाज करावे अशा स्पष्ट सूचना आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिल्या.