एक हजार रुपये साठी पाच वर्षीय बालकाला आर्किड इंटरनॅशनल स्कूल ने केले बंधक, पालकांची तक्रार

  • Admin
  • नवी मुंबई
  • Jan 31, 2025

नवी मुंबई | नेरुळ येथील सीवूड्स परिसरातील एका खासगी शाळेने पाच वर्षीय विद्यार्थ्याला एका वर्गात चार तास बंधक ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या १,००० रुपयांच्या थकबाकीमुळे मुलाला वेगळ्या वर्गात बसवून ठेवण्यात आले. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर अखेर एनआरआय पोलिस ठाण्यात शाळेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

नेरुळ येथील ऑर्चीडस इंटरनॅशनल स्कूल ( Orchids International School ) मध्ये शिकणाऱ्या एका पाच वर्षीय मुलाच्या पालकांनी सांगितले की, शाळेने नोव्हेंबर महिन्यात थकीत फी भरण्याची सूचना दिली होती. त्यांनी संपूर्ण रक्कम भरली असून शिल्लक शून्य होती. मात्र, अचानक पुन्हा १,००० रुपये भरण्याचा मेसेज आला, परंतु या रकमेचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

२८ जानेवारी रोजी सकाळी मुलाला शाळेत सोडल्यानंतर दुपारी १२.३० वाजता घ्यायला गेल्यावर समजले की, मुलाला वेगळ्या वर्गात बसवून ठेवले होते. याबाबत विचारणा केली असता शाळेने १,००० रुपये न भरल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

पालकांनी दिली तक्रार, पोलिसांकडून उशिरा कारवाई

या प्रकारानंतर मुलाच्या वडिलांनी नेरुळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, दुसऱ्या दिवशीपर्यंतही कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर पालकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी शाळेच्या प्रिन्सिपल आणि समन्वयकाविरोधात तक्रार नोंदवली.

शाळेचे म्हणणे काय?

या प्रकरणावर शाळेच्या प्रिन्सिपल वैशाली सोलानी यांनी आरोप फेटाळले आहेत. भारत समाचार टीवी सी बोलताना त्यांचा दावा केला आहे की, मुलाला इतर विद्यार्थ्यांसोबतच ठेवण्यात आले होते आणि सीसीटीव्ही फूटेजमध्येही त्याला कुठेही वेगळ्या वर्गात ठेवलेले दिसत नाही.

पालक संतप्त, पुढील कारवाईची प्रतीक्षा

या घटनेनंतर पालकांमध्ये नाराजी पसरली असून शाळेच्या व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आता पोलिस तपासात नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.