पनवेल रेल्वे स्थानकावर युवकावर प्राणघातक हल्ला, दोन आरोपी फरार

  • Admin
  • नवी मुंबई
  • Feb 20, 2025

पनवेल। पनवेल रेल्वे स्थानकावर घरगुती वादातून एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. विशाल राम माने (वय 35, राहणार कळंबोली, नवी मुंबई) यांना त्यांच्या मेहुण्याने आणि साडूने मारहाण करत गंभीर दुखापत केली.

ही घटना 19 फेब्रुवारी रोजी रात्री 21.25 वा. पनवेल रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 06 वर घडली. विशाल माने आपल्या भावाशी फोनवर बोलत असताना, बाबासो मनोहर थोरात (वय 29) आणि सिद्धार्थ सावंत (वय 35) हे त्यांना भेटले. घरगुती वादातून वाद वाढल्याने आरोपींनी हाताला फायटर लावून विशाल माने यांच्या कपाळावर फटका मारला आणि चालू ट्रेन पकडून पळून गेले.

जखमी अवस्थेत विशाल माने यांनी तत्काळ पनवेल रेल्वे पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. सध्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, रेल्वे स्थानकावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पनवेल रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.