
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
बस ड्रायव्हर अटकेत
सीवूड्समधील दिल्ली पब्लिक स्कूलमधील घटना
२४ एप्रिल रोजी दुपारी प्रकार उघड
बस ड्रायव्हरवर POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल
पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अटक केली
प्राचार्यांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप
परिसरात संताप, पालकांकडून सुरक्षेची मागणी
नवी मुंबई ।नवी मुंबईच्या सीवूड्स परिसरातील दिल्ली पब्लिक स्कूल ( DPS ) शाळेत एका चार वर्षीय विद्यार्थ्याच्या लैंगिक शोषणाची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी शाळेच्या बस ड्रायव्हरविरोधात एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी दुपारी शाळेतून घरी परतल्यानंतर विद्यार्थ्याने अस्वस्थपणे काही सांगितल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. पालकांनी तत्काळ शाळेच्या प्राचार्यांशी संपर्क साधला. मात्र, प्राचार्यांनी या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष करत बस ड्रायव्हरवर कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप पालकांनी केला आहे.
पोलिसांची कारवाई:
एनआरआय पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध POCSO Act अंतर्गत कलम ४, ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
परिसरात संताप:
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पालक आणि नागरिक शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त करत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात शाळेने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.ही घटना केवळ एका कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेसाठी एक मोठा इशारा आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर धोरणांची अंमलबजावणी आणि प्रशासनाची जबाबदारी निश्चित होणे अत्यावश्यक आहे.