
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
'ऑपरेशन सिंदूर'ला पाठिंबा देण्याची अनोखी संकल्पना
नवी मुंबई | देशभरात सध्या चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेला आता समाजकार्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतूनही पाठिंबा मिळू लागला आहे. नवी मुंबईतील म्हात्रे कुटुंबीयांच्या लग्न सोहळ्यात पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त करत हळदीच्या समारंभात बारकाईने एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
या समारंभात बारात्यांनी थेट पाकिस्तानचा झेंडा जमिनीवर अंथरून त्यावर नृत्य करत आपला निषेध नोंदवला. विशेष म्हणजे, वधू आणि नातेवाईक महिलांनीही या झेंड्यावर नाच करत पाकिस्तानविरोधात आपला रोष व्यक्त केला.
पेशाने साउंड आणि ऑर्केस्ट्रा सेवा पुरवणारे प्रदीप म्हात्रे, जे वधूचे काका आहेत, यांनीच या संकल्पनेची मांडणी केली. आगरी समाजात हळदीचा समारंभ विशेष महत्त्वाचा मानला जातो. याच परंपरेचा फायदा घेत म्हात्रे कुटुंबाने या देशभक्तिपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले.
या नृत्यादरम्यान शंकर महादेवन यांचे "जोर लगा लो ये दुनिया वालों, सबसे आगे है हिंदुस्तान" हे देशभक्तिपर गीत वाजवण्यात आले. या गीताच्या तालावर उपस्थितांनी उत्साहात झेंड्यावर नाच करत पाकिस्तानविरोधात आपली भावना व्यक्त केली.
हा उपक्रम सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. काही जणांनी या प्रकाराचे कौतुक करत देशभक्तीचा प्रतीक म्हणून पाहिले, तर काहींनी झेंड्याचा अवमान केल्याचा आरोप केला आहे.