
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
१५ दिवसांची पोलीस कोठडी
नवी मुंबई । नवी मुंबईसह ठाणे आणि मुंबई परिसरातील नागरिकांना स्वस्तात प्लॉट मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या इन्फ्राटेक लँड्स या कंपनीचा संचालक किसन धाऊजी राठोड ( Kisan Rathod) याला अखेर नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. बेलापूर न्यायालयाने त्याला १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत पोलिसांच्या प्राथमिक तपासात ८० लाख रुपयांची फसवणूक समोर आली आहे, मात्र ही रक्कम कोट्यवधींपर्यंत जाऊ शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे.
टीव्ही जाहिरातीद्वारे सापळा
२०२३ साली किसन राठोडने विविध टीव्ही चॅनेल्सवर एक भूरळ पाडणारी जाहिरात प्रसिद्ध केली होती:
> “फक्त २ लाख रुपये प्रति गुंठा पासून सुरू – तुमचं स्वप्नातलं घर आजच बुक करा! – कार्यालय : पुजीत प्लाझा, सेक्टर ११, बेलापूर, ऑफिस नं. ५०५.”
स्वस्तात घर मिळविण्याचे स्वप्न घेऊन अनेक नागरिक या कार्यालयात पोहोचले. कार्यालयातील कर्मचारी ग्राहकांना चिर्ले जंक्शनजवळील विंधणे गावाजवळ नेऊन दूरवरून जमीन दाखवत. पावसाचे किंवा दलदलीचे कारण देत पुन्हा कार्यालयात परत आणले जाई.
फसवणुकीचा पद्धतशीर प्लॅन
ग्राहकांकडून सुरुवातीला बुकिंगच्या नावाखाली १–२ लाख रुपये घेतले जात. त्यानंतर प्लॉट मोजणी, नकाशा पासिंग, रजिस्ट्रेशन, क्लिअरन्स आणि विकास शुल्क अशा विविध कारणांनी हप्त्यांमध्ये मोठ्या रक्कमा उकळल्या जात. मुंबईतील केईएम रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत सांगितले की, त्यांनी एकूण ११ लाख ६० हजार रुपये दिले, मात्र जमीन मिळाली नाही, आणि कोणतेही अधिकृत दस्तऐवजही दिले गेले नाहीत.
पीडितांची संख्या वाढतेय
या प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांत आल्यावर अनेक पीडित पुढे आले आहेत. गेल्या आठवड्यात गुरुवारी आणि शुक्रवारी एकूण ८ पेक्षा जास्त तक्रारी बेलापूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की फसवणुकीची रक्कम आता ८० लाखांच्या वर गेली असून, आणखी बळी समोर येण्याची शक्यता आहे.
पोलिसांची कारवाई आणि जनतेसाठी आवाहन
पोलिसांनी बेलापूरमधील पुजीत प्लाझामधील ऑफिस सील केले असून, बोगस करारपत्रे, बँक व्यवहारांची कागदपत्रे जप्त केली आहेत. नवी मुंबई पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, ज्यांनी इन्फ्राटेक लँड्समध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी.
पुन्हा एकदा तोच डाव – राठोडचा गुन्हेगारी इतिहास
किसन राठोड याच्या विरोधात यापूर्वीही सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत फसवणूक आणि बनावट दस्तऐवज तयार केल्याचे सात गुन्हे दाखल आहेत. २०१३ मध्ये पुणे-बंगळुरू महामार्गालगतच्या एनएचएआयच्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणीही त्याला राजगड पोलिसांनी अटक केली होती. पर्यावरण संरक्षण कायद्यान्वयेही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सध्या पोलिस कोठडीत चौकशी सुरू
बेलापूर न्यायालयाने त्याला १५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, पोलिस त्याच्याकडून इतर साथीदारांची माहिती, आर्थिक व्यवहार आणि आणखी किती लोक फसवले गेले, याचा तपास करत आहेत. पोलिस या प्रकरणाकडे एक मोठा रिअल इस्टेट घोटाळा म्हणून पाहत आहेत.