
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
माजी आमदार संदीप नाईक यांची पालिका प्रशासनाला सूचना
नवी मुंबई ।नवी मुंबईतील पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात संभाव्य समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी माजी आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांना एक सविस्तर निवेदन पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी शहरात मान्सूनपूर्व कामांची सद्यस्थिती, मागील अनुभव आणि येणाऱ्या संभाव्य धोरणांबाबत महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, दरवर्षी महानगरपालिकेमार्फत मान्सूनपूर्व कामे करण्यात येत असली तरी अनेक वेळा ती वेळेत पूर्ण न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. नालेसफाई, ड्रेनेजची कामे, होल्डिंग पाँडची स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती यांसारखी कामे अर्धवट राहिल्यामुळे पावसाच्या वेळी शहरात पाणी साचणे, नाले तुंबणे, अपघात होणे अशा घटना घडत असतात.
नाईक यांनी विशेषतः धोकादायक झाडांची फांद्यांची छाटणी, डोंगर परिसरातील वस्तीची पाहणी, तसेच धोकादायक इमारतींची तपासणी करून आवश्यक ती उपायोजना करण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षी अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या, त्यामुळे यावर्षी आधीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.
साथीचे आजार नियंत्रण उपाय योजना
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे पूर्वनियोजन करण्याची सूचना त्यांनी केली आहे. पूरस्थिती किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तातडीने मदत आणि पुनर्वसन कार्य करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रणाली सक्षम ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.
महापालिका आणि महावितरण मध्ये समन्वयाची गरज
संदीप नाईक यांनी महावितरण विभागाच्या निष्काळजीपणावरही बोट ठेवले असून, शहरात उघड्या विद्युत वाहिन्यांमुळे होणाऱ्या अपघातांचा उल्लेख करून महावितरण आणि महापालिका यांच्यात समन्वय बैठकीची गरज व्यक्त केली आहे.
वरील सर्व मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करून संबंधित विभागांना योग्य सूचना देण्यात याव्यात आणि सर्व मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, जेणेकरून शहरातील नागरिकांना सुरक्षित आणि त्रासमुक्त पावसाळा मिळू शकेल, अशी अपेक्षा संदीप नाईक यांनी व्यक्त केली आहे.