शिरस्तेदार संजीपान सानप ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ACB च्या सापळ्यात रंगेहाथ अडकले

नवी मुंबई | नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्र (NAINA प्रकल्प) अंतर्गत जमीन मोजणीच्या कामासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शिरस्तेदारास अँटी करप्शन ब्युरो (ACB) नवी मुंबई युनिटने रंगेहाथ पकडले आहे. आरोपी संजीपान प्रभाकर सानप (वय ४४ वर्षे) हे जिल्हा अधिक्षक, भुमी अभिलेख, नवी मुंबई येथील शिरस्तेदार पदावर कार्यरत आहेत.

तक्रारदाराच्या मित्राची जमीन NAINA प्रकल्पात येते. या जमिनीची सर्व्हे/आकारफोड प्रक्रिया करण्यासाठी तक्रारदाराने सिडको कार्यालयात अर्ज केला होता. शासकीय चलन भरून देखील कामात विलंब होत असल्याने तक्रारदाराने शिरस्तेदार सानप यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी काम करून देण्यासाठी एकूण ₹२,००,०००/- लाचेची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ₹५०,०००/- मागितले गेले.

याबाबतची तक्रार दिनांक ४ जून २०२५ रोजी ACB नवी मुंबई युनिटकडे प्राप्त झाली. त्यानुसार ५ जून रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यान शिरस्तेदार सानप यांनी लाचेची मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ६ जून रोजी सापळा कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपीने तक्रारदाराकडून ₹५०,०००/- स्वीकारले असता, ACB च्या अधिकाऱ्यांनी पंच साक्षीदारांसमक्ष त्याला रंगेहाथ अटक केली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांनी सापळा अधिकारी म्हणून भूमिका बजावली. पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या देखरेखीखाली ही कारवाई पार पडली. सापळा पथकात पो.नि. संतोष पाटील, सहा पो.उपनिरीक्षक प्रदीप जाधव, उमा बासरे, निखिल चौलकर, विशाल अहिरे आणि प्रमिला विश्वासराव यांचा समावेश होता.

ही कारवाई ठाणे ACB परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक संजय गोवीलकर आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.

ACB ठाणे परिक्षेत्राच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शासकीय कामासाठी कोणीही अधिकारी किंवा एजंट अतिरिक्त पैसे मागत असल्यास तात्काळ ACB  कार्यालयाशी संपर्क साधावा.