' मन की बात’ कार्यक्रमाचे 123वे प्रक्षेपण, वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Jun 29, 2025

नवी मुंबई | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी मासिक संवाद उपक्रम "मन की बात" चा 123 वा भाग रविवारी घणसोलीत प्रसारित करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे श्रवण राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या वेळी माजी सांसद डॉ संजीव नाईक,माजी महापौर सागर नाईक, माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागील जनसहभाग, देश-विदेशात झालेली विक्रम नोंदवणारी कामगिरी आणि आपत्कालीन काळातील लोकशाहीची गळचेपी यावर मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपत्काल हा भारताच्या लोकशाहीचा काळा अध्याय होता, असेही ठामपणे नमूद केले.

पुढे बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, भारताला ट्रेकोमा-मुक्त देश म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) घोषित केले आहे. ही गोष्ट आरोग्य क्षेत्रातील मोठी कामगिरी ठरते. तसेच देशातील 64 टक्के जनतेला केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळत आहे, हे सांगून समावेशक विकास आणि सामाजिक न्याय याबाबत सरकारची कटिबद्धता त्यांनी अधोरेखित केली.

पर्यावरण दिन निमित्त त्यांनी प्रकृती संवर्धन, महिला बचतगटांचे हस्तनिर्मित उत्पादन, आणि स्वदेशी उत्पादने यावर प्रकाश टाकत ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, "मन की बात हा संवादाचा एक प्रभावी मंच असून तो देशवासियांना राष्ट्रहिताच्या विचारांकडे प्रवृत्त करतो. समाजसेवा, स्वच्छता, आत्मनिर्भरता आणि नवकल्पनांचा संदेश सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम पंतप्रधान करत आहेत."