पालिकेच्या लेखी आश्वासनानंतर कामगारांचे मुख्यमंत्री बंगल्यावरील आंदोलन तात्पुरते स्थगित
- Admin
- नवी मुंबई
- Sep 05, 2024
नवी मुंबई। नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांना समान काम समान वेतन मिळावे यासाठी वाशी ते मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर समाज समता कामगार संघाच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात येणार होता; मात्र मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने एकत्र जमलेल्या कामगारांना पाहून धडकी भरलेल्या महापालिका प्रशासनाने या संदर्भात लेखी आश्वासन दिल्याने हा मोर्चा तात्पुरता स्थिती करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष मंगेश लाड यांनी दिली.
१५ दिवसात निर्णय न झाल्यास तारखेला २० सप्टेंबर ला वर्षा बंगल्यावर धडकणार अशी चेतावणी लाड यांनी दिली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने स्वीकारलेल्या समान काम समान वेतन धोरणाप्रमाणे २००७ साली नियुक्त कायम कर्मचाऱ्यास आज रोजी मिळणारे वेतन तथाकथित कंत्राटी कामगारांना मिळावे. यासाठी समाज समता कामगार संघाच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार मागील तीन वर्षापासून लढा देत आहेत.
२५ जुलै २०२३ साली नवी मुंबई महानगरपालिकेने कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन धोरणाप्रमाणे वेतन देणे बाबत मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव प्रधान सचिव नगर विकास यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावावरती त्वरित निर्णय घ्यावा यासाठी समाज समता कामगार संघाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता.
नोव्हेंबर २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिनियमातील तरतूद आणि प्रचलित नियमाप्रमाणे कारवाई करावी, असे निर्देश नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना दिले होते. यावर कार्यवाही होत नसल्याने संघटनेच्या वतीने ९ दिवस आझाद मैदान येथे उपोषण केले होते. या उपोषणास ६ महिन्यांचा कालावधी उलटूनही प्रधान सचिव यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना कळवले नाही.
या निषेधार्थ नवी मुंबईतील सर्व कंत्राटी कामगार मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी त्यांना विनंती करण्यासाठी वाशी ते मुख्यमंत्री यांचे शासकीय निवास वर्षा बंगला या ठिकाणी आज पायी चालत जाणार होते. मात्र वाशी पोलिसांनी मोर्चा वाशी रेल्वे स्टेशन येथे अडवला होता.
दुपारी महानगर पालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड, प्रशासन उपायुक्त शरद पवार, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अजय गडदे यांनी शिष्टमंडळाची वाशी रेल्वे स्टेशन येथे येऊन भेट घेतली आणि यापुढे नवी मुंबई महानगर पालिकेचे उपायुक्त अजय गडदे स्वतः पाठपुरावा घेऊन एका महिन्यात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे आजचे आंदोलन २० तारखेपर्यंत स्थगित करण्यात आले.