नागरी आणि पायाभूत सुविधांची कामे केल्यानंतरच 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करावा

  • Admin
  • नवी मुंबई
  • Jun 05, 2024

 आमदार गणेश नाईक यांनी स्पष्ट केली भूमिका 

 नवी मुंबई । कल्याण ग्रामीणच्या हद्दीमध्ये असलेली 14 गावे नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करायचे झाल्यास अगोदर या गावांमध्ये पायाभूत आणि नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात मगच या गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत करावा, अशी भूमिका लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केली आहे. 

 पायाभूत सुविधांसाठी सुमारे 6,100 कोटी रुपये आणि निव्वळ गावठाणातील नागरी सुविधांसाठी सुमारे 591 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून एमएमआरडीए किंवा अन्य प्राधिकरणांमार्फत ही कामे करावीत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र दिले असून निश्चितच त्यावर सकारात्मक कार्यवाही होईल असा विश्वास लोकनेते आमदार नाईक यांनी व्यक्त केला आहे. या गावांच्या नवी मुंबईत समावेशासाठी विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 31 मार्च 2022च्या पत्राद्वारे नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी शासनाचे प्रधान सचिव नगर विकास विभाग 2 यांना कळविले असून त्यालाही दोन वर्षांच्या कालावधी उलटून गेल्याने या खर्चामध्ये निश्चित वाढ होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण मतदारसंघामधील दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू, नावाळी वाकळण बामाली, नारिवली, बाळे, नागाव, भंडार्ली, उत्तरशिव व गोठेघर या 14 गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश करावा अशी स्थानिकांची मागणी होती.

12 सप्टेंबर रोजी नगरविकास विभागाने या संदर्भातील जीआर काढला आहे.

2000 साली ही चौदा गावे नवी मुंबई पालिकेत होती. मात्र, महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या कर आकारणीला विरोध करीत 14 गावांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर गावांचा विकास न झाल्याने अखेर परत एकदा नवी मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारित येण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. 

 उत्तरेकडून येताना ठाणे महापालिकेची हद्द ओलांडून आणि पनवेल महापालिकेची हद्द ओलांडून या गावांमधून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात यावे लागते. या गावांचे क्षेत्र कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात येत असल्याने महापालिकेची हद्द ऐरोली, बेलापूर यासह कल्याण ग्रामीण अशा तीन विधानसभा क्षेत्रात विभागली जाणार आहे तसेच या गावांमधील पायाभूत सुविधांवर शेकडो कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्याचा आर्थिक भार नवी मुंबई महापालिकेवर पडणार आहे. या 14 गावांमधील अनधिकृत भंगाराची गोदामे तसेच शासकीय जागांवरील अतिक्रमणे बांधकामे झोपडपट्ट्या याबाबत स्पष्टता नाही 14 गावांमधील रस्ते पाणी दिवाबत्ती इत्यादी पायाभूत सुविधांवर नवी मुंबईकरांच्या कररुपी पैशांचा वापर न करता पायाभूत संविधावर होणारा खर्च एमएमआरडीए अथवा इतर प्राधिकरणामार्फत करण्यात यावा. मार्च 2022 मध्ये विधानसभा सभागृहामध्ये या विषयावर चर्चा करताना देखील लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी या गावांचा पालिकेत समावेश करण्याअगोदर आडवली भूतवली येथून पारसिकच्या डोंगरातून एक बोगदा काढून या 14 गावांना नवी मुंबईला जोडणारा रस्ता तयार करावा अशी मागणी केली आहे. सदर 14 गावांमधील पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली असून त्या अनुषंगाने प्रथम काम व्हायला पाहिजे. नवी मुंबई महापालिकेने अटी आणि शर्तींचा समावेश करून जो ठराव राज्य शासनास सादर केला आहे व नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी 31 मार्च 2022 रोजी अपेक्षित खर्चाबाबत शासनाला पत्र सादर केले आहे त्याची पूर्तता केल्यानंतरच गावांच्या समावेशाबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. 

 पत्रकार परिषदेला माजी महापौर सागर नाईक, महापालिकेचे माजी सभागृहनेते रवींद्र इथापे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत स्थायी समितीचे माजी सभापती नवीन गवते, माजी नगरसेवक सुरज पाटील, माजी परिवहन समिती सदस्य वीरेश सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.