स्वच्छता ही सेवा’ अभियानात ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाव्दारे 300 हून अधिक देशी झाडांचे वृक्षारोपण*
- Admin
- नवी मुंबई
- Sep 16, 2024
नवी मुंबई| केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने प्राप्त निर्देशानुसार 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा’ साजरा करण्यात येत असून या अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्यामधील ‘एक पेड माँ के नाम’ हा एक अभिनव उपक्रम सेक्टर 36, नेरूळ येथील गणपतशेठ तांडेल मैदानाजवळील उद्यानात संपन्न झाला.
याप्रसंगी विधानसभा सदस्य आ.गणेश नाईक, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, माजी आमदार संदीप नाईक, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, उद्यान विभागाचे उपआयुक्त दिलीप नेरकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ.अजय गडदे व परिमंडळ 2 उपआयुक्त डॉ.संतोष वारूळे, अति.शहर अभियंता अरविंद शिंदे, नेरूळ विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ.अमोल पालवे, बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, माजी नगरसेवक रविंद्र इथापे, स्वच्छ नवी मुंबई मिशनच्या वुमेन आयकॉन रिचा समित आणि इतर उपस्थितांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे या उपक्रमात लेट्स सेलिब्रेट फिटनेस संस्थेच्या सहयोगातून 167 तृतीयपंथी नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत वृक्षारोपण केले.
आपल्या वडिलधा-यांच्या सन्मानार्थ झाड लावण्याची आपली परंपरा आहे, त्यानुसार मा.पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राबविला जात असल्याचा आनंद व्यक्त करीत आ.गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता अशा विविध क्षेत्रांप्रमाणेच वृक्षारोपणातून पर्यावरणासाठीही लौकिकाला साजेसे काम होत असल्याबद्दल आयुक्त व सर्व सहकारी, अधिकारी यांचे कौतुक केले. सध्याच्या काळात पर्यावरणाचा समतोल राखणे महत्वाचे असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिका त्यादृष्टीने समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी वातावरणातील बदलामुळे होणारे परिणाम थांबविण्याकरिता सध्याचे जागतिक तापमान वाढीचे प्रमाण लक्षात घेऊन सर्वांनी जागरूक होण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत वैयक्तिक, संस्थात्मक व सामाजिक अशा तिन्ही पातळ्यांवर प्रत्येक नागरिकाने आपली पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. वृक्षारोपण हा त्याचाच एक महत्वाचा भाग असल्याचे सांगत आयुक्तांनी ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम आपले जीवन समृध्द करणा-या आईचे स्मरण करीत धरतीमातेलाही समृध्द करणारा उपक्रम असल्याचे सांगितले. पूर्वजांकडून आपल्याला खूप काही मिळालेले आहे, त्यामुळे पुढच्या पिढीसाठी सामाजिक दायित्व म्हणून हा वृक्षारोपणाचा उपक्रम महत्वाचा असल्याचेही ते म्हणाले. ‘स्वच्छ भारत मिशन’ला 10 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करीत यामध्ये नवी मुंबईने नागरिकांच्या सक्रिय सहभागातून नेहमीच आघाडी घेतली असल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला.
शहरात पशूपक्ष्यांचा अधिवास वाढेल अशा 300 हून अधिक देशी वृक्षरोपांची यावेळी लागवड करण्यात आली. ज्यामध्ये जांभूळ, वड, पिंपळ, आंबा, फणस, मोहोगणी, आवळा, पेरू, चिक्कू, सीताफळ, करंज, अर्जुन, बकुळ, सीता, अशोक, काजू, आंबा, वड, पिंपळ, करंज आदी वृक्षारोपण करण्यात आले.
विराग-मधुमालती यांचा राजस्थानपर्यंत चालत जाऊन 1 लाख वृक्षारोपणाच्या उपक्रमाचा शुभारंभ
सुप्रसिध्द गायक विराग वानखेडे आणि मधुमालती यांच्या ‘मिशन सेव्ह मदर अर्थ’ शिर्षकांतर्गत नवी मुंबई (महाराष्ट्र) ते नाकोडाजी (राजस्थान) पर्यंतच्या 1000 किमी. हून अधिक अंतर चालत जाऊन वृक्षारोपणासह ‘ग्रीन वॉकेथॉन’ उपक्रमाचा प्रारंभ संपन्न झाला. आ.गणेश नाईक आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्यासह सर्व उपस्थितांनी या पर्यावरणशील उपक्रमाचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रापासून राजस्थानपर्यंत चालत जाऊन जागोजागी 1 लाख वृक्षलागवड करण्याचा त्यांचा संकल्प यशस्वी होईल असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.