बदलापुर पॉक्सो केस आरोपी अक्षय शिंदेचा एनकाउंटर; ठाणे पोलीस पथकावर हल्ला
- Admin
- ठाणे
- Sep 24, 2024
ठाणे। बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक असलेला अक्षय अण्णा शिंदे (वय 24) याचा आज पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. आरोपीवर पोक्सो आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल होते. तो तळोजा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.
गुन्हे शाखेचे पथक त्याला बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील एका नव्या गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेण्यास तळोजा मध्यवर्ती कारागृहात गेले होते. आरोपी अक्षय शिंदे याला ताब्यात घेऊन ठाण्याकडे परत येत असताना, सायंकाळी 6:00 ते 6:15 च्या दरम्यान मुंब्रा बायपासवर पोलिसांच्या वाहनातच हा गंभीर प्रकार घडला.
पोलिसांवर गोळीबार
ताब्यात असलेला अक्षय शिंदे याने अचानक पथकातील अधिकारी सपोनि निलेश मोरे यांच्या कमरेला लावलेले सर्व्हिस पिस्तुल खेचून घेतले आणि पोलिसांच्या दिशेने 3 राऊंड फायर केले. यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागली, तर उर्वरित दोन गोळ्या इतरत्र लागल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पथकातील इतर अधिकारीही धास्तावले.
स्वसंरक्षणात पोलिसांनी फायर केले
अचानक झालेल्या हल्ल्यानंतर स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपी अक्षय शिंदेच्या दिशेने एक गोळी झाडली. या गोळीबारात आरोपी गंभीर जखमी झाला. यानंतर पोलीस पथकाने जखमी पोलीस अधिकारी निलेश मोरे आणि आरोपी अक्षय शिंदे यांना तातडीने उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अक्षय शिंदे यास तपासून मृत घोषित केले. पोलिस अधिकारी निलेश मोरे यांना पुढील उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथे हलवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोस्टमॉर्टेम सर जे जे हॉस्पिटलमध्ये
आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबईतील सर जे.जे. हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. पोलिसांकडून या घटनेची सखोल चौकशी सुरु असून, आरोपीने पोलिसांवर हल्ला का केला याचा तपास केला जात आहे.ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या जनसंपर्क अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून, आरोपीवर आधीपासूनच गंभीर गुन्हे दाखल होते.