सुनेत्रा पवार ठरणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री,आज सायंकाळी ५ वाजता शपथविधी

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Jan 31, 2026

सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना

मुंबई | प्रतिनिधी

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणाकडे जाणार, याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झाल्या असून, आज सायंकाळी ५ वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. यामुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक

शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार असून, या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार आहे. गटनेतेपदाची निवड झाल्यानंतर त्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या जाहिरात आणि जनसंपर्काची जबाबदारी पाहणाऱ्या डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा हे सुनेत्रा पवार यांचा निरोप घेऊन मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे.

अपघाती निधनानंतर निर्माण झालेली पोकळी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर, पक्ष आणि कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे, अशी मागणी जोर धरत होती. तसेच पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारीही त्यांच्याकडे द्यावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

पक्षाच्या आग्रहानंतर निर्णय

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाकडून होत असलेल्या सातत्यपूर्ण आग्रहानंतर आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. नरेश अरोरा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर हा निर्णय अंतिम करण्यात आल्याचे समजते.

शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदाची औपचारिक निवड होणार असून, त्यानंतर सायंकाळी राजभवनात शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे.