तुर्भे येथे तरुणीचा छळ; सराईत आरोपी संदीप तीर्थे अटकेत

  • Admin
  • नवी मुंबई
  • Feb 07, 2026

नवी मुंबई।तुर्भे स्टोअर परिसरात राहणाऱ्या संदीप तीर्थे या आरोपीने जानेवारी २०२६ मध्ये तुर्भे रेल्वे स्थानक परिसरात एका तरुणीचा पाठलाग करत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणी घरी जाण्यासाठी शेअरिंग ऑटोरिक्षाची वाट पाहत असताना आरोपीने तिचा पाठलाग करून “मी तुला लाईक करतो” असे बोलत तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न केली.

याच आरोपीने दि. ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा तरुणीचा छळ केला. ऑटोरिक्षामध्ये इतर कोणतेही प्रवासी नसताना आरोपीने “शुभांगी, तू माझ्या बाजूला येऊन बस” असे बोलत तरुणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे तरुणी घाबरून गेली.

यानंतर तरुणीने ही संपूर्ण घटना आपल्या वडिलांना सांगितली. आरोपीस जाब विचारण्यासाठी तरुणीचे वडील व कुटुंबीय पावणे नाका परिसरात गेले असता आरोपीने तरुणीच्या भावास हाताने मारहाण केली.

या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संदीप तीर्थे याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपीविरोधात यापूर्वीही एपीएमसी पोलीस ठाणे व तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. संदीप तीर्थे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिक भयभीत असून तो विविध लोकांविरोधात बोगस तक्रारी दाखल करून ब्लॅकमेलिंग करत असल्याचाही आरोप आहे.सध्या तुर्भे पोलीस आरोपीचा सखोल तपास करत असून याआधीही त्याने इतर किती मुलींना अशा प्रकारे त्रास दिला आहे, याचीही चौकशी सुरू आहे.