होळी–धूलिवंदन काळात ठाण्यात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

१६८१ वाहनचालकांवर कारवाई; १९६ मद्यपी चालक तावडीत

ठाणे ।होळी आणि धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि रस्ते अपघात टाळण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत ठाणे शहर वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात आली. पाचही परिमंडळात ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत तब्बल १ हजार ६८१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यात १९६ मद्यपी चालक पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत.


होळीच्या उत्सवात मद्यप्राशन करून वाहन चालवण्याचे प्रकार वाढू नयेत, यासाठी वाहतूक विभागाने विशेष व्यूहरचना आखली होती. प्रमुख चौक, महामार्ग, तसेच संवेदनशील भागात पोलिसांनी नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी केली. ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या सहाय्याने मद्यप्राशन केलेल्या चालकांची तपासणी करण्यात आली.

कारवाईचा सविस्तर तपशील :

१९६ – मद्यप्राशन करून वाहन चालवणारे

८३६ – विनाहेल्मेट दुचाकीस्वार

४०८ – ट्रिपल सीट दुचाकीस्वार

२२७ – ऑटो रिक्षामध्ये फ्रंट सीट घेणारे चालक

१४ – विरुद्ध दिशेने वाहन चालवणारे

अशा प्रकारे एकूण १६८१ वाहनचालकांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला.

ही मोहीम आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या देखरेखीखाली वाहतूक विभागातील सुमारे ४५० अधिकारी व कर्मचारी नाकाबंदीसाठी तैनात करण्यात आले होते. वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी कारवाईची माहिती दिली.


पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, सण-उत्सवाच्या काळात मद्यप्राशन करून वाहन चालवणे, हेल्मेट न घालणे, ट्रिपल सीट प्रवास करणे किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे यावर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.


रस्ते सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.