नामदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा नवी मुंबई पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला!
- Admin
- महाराष्ट्र
- Feb 05, 2026
महापौरपदी सुजाता पाटील तर उपमहापौरपदी दशरथ भगत यांची बिनविरोध निवड
नवी मुंबई । वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकला असून तेराव्या महापौर म्हणून भाजपाच्या सुजाता पाटील आणि उपमहापौरपदी दशरथ भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर निवडीचा कार्यक्रम आज बेलापूर येथील महापालिका मुख्यालयातील राजमाता जिजाऊ सभागृहात पार पडला. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी-अधिकारी रणजीत पाटील पिठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते.
अलीकडेच पार पडलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक 65 जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एका अपक्ष नगरसेवकाने बिनशर्थ पाठिंबा दिल्यानंतर भाजपाचे महापालिकेतील संख्याबळ 66वर गेले आहे. शिवसेना शिंदे गटाला 42 जागांवर समाधान मानावे लागले आहे. संख्याबळ कमी असताना देखील शिवसेनेने महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले होते. परंतु निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याअगोदर शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार सरोज पाटील आणि उपमहापौर पदाचे उमेदवार आकाश मढवी यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यानंतर पिठासीन अधिकारी रणजीत पाटील यांनी महापौरपदी भाजपाच्या सुजाता पाटील आणि उपमहापौरपदी दशरथ भगत यांची निवड जाहीर केली. यावेळी महापालिका सभागृहामध्ये भारतीय जनता पक्ष, पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व आणि नामदार गणेश नाईक यांचा जयघोष करण्यात आला.
माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, प्रदेश भाजपाचे अभिजीत पेडणेकर तसेच माजी महापौर आणि भाजपाचे विद्यमान गटनेते सागर नाईक यांनी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन केले.
नवनिर्वाचित महापौर सुजाता पाटील आणि नवनिर्वाचित उपमहापौर दशरथ भगत यांनी आपल्या मनोगतमध्ये त्यांना या प्रतिष्ठेच्या पदांवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री नामदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर आणि विद्यमान भाजपाचे गटनेते सागर नाईक, भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील या मान्यवरांचे आभार व्यक्त केले. दिवंगत मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभागृहाच्या वतीने महापौर आणि उपमहापौरांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव नगरसेवक रवींद्र इथापे यांनी मांडला तो सर्व संमतीने मंजूर करण्यात आला. महापौर सुजाता पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये महापौरपदी त्यांची झालेली निवड संपूर्ण महिला वर्गाचा सन्मान असल्याचे नमूद केले. महापालिकेच्या माध्यमातून महिलांच्या प्रगतीला चालना देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नामदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबई शहराने विकासाची एक वेगळी उंची गाठली आहे. विकासाचे हे व्हिजन पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, पर्यावरण या विषयांमध्ये प्राधान्याने काम करणार असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवांच्या समस्या संवेदनशीलपणे सोडविणार असल्याचे सांगितले. सभागृहातील सर्व सहकारी सदस्यांच्या सहकार्याने शांततेत आणि शिस्तीमध्ये कामकाज करण्यावर भर असणार आहे. या कामी सर्वपक्षीय सदस्य आणि प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित असून आपण सर्वांनी एकत्र काम करून नवी मुंबईचे हित साधू या, असे आवाहन देखील त्यांनी केले. अर्ज मागे घेऊन महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल महापौर पाटील यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले.