माथाडी कामगारांच्या समस्यांवर तातडीने काढणार तोडगा -देवेंद्र फडणवीस
- Admin
- नवी मुंबई
- Sep 25, 2024
नवी मुंबई।क्रांतीसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांच्या समस्यांवर भाष्य केले. त्यांनी माथाडी कामगारांना दिलासा देत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.या दरम्यान आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे,नरेंद्र पाटील,शशिकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. नाशिक आणि वडाळा येथे निर्माण झालेल्या प्रश्नांवर पुढील 15 दिवसात बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, घरांच्या प्रश्नावरही तातडीने निर्णय घेण्यात येईल.
मराठा आरक्षणासाठी प्रयत्न
मराठा आरक्षणाच्या मागणीला कायद्याच्या चौकटीत बसवून मार्गी लावण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. "जे आरक्षण दिले जाईल, ते न्यायालयात टिकणे महत्त्वाचे आहे," असेही ते म्हणाले.
सारथीच्या माध्यमातून यशस्वी उमेदवार
फडणवीस यांनी सांगितले की, सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातून 12 IAS, 18 IPS आणि 480 MPSC उमेदवार यशस्वी झाले आहेत. तसेच, आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख उद्योजक घडवले असून रु. 8,400 कोटींपेक्षा जास्त कर्ज वितरण केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी योजना
जे मराठा विद्यार्थी वसतिगृहामध्ये प्रवेश मिळवू शकत नाहीत, त्यांना रु. 7000/- निर्वाह भत्ता दिला जातो. मुलींना मोफत शिक्षण दिले जात आहे.
नरेंद्र पाटील यांचा सत्कार
फडणवीस यांनी माथाडी कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी वचन दिले आहे. माथाडी बांधवांचा पैसा गडप करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला।