लोकनेते नामदार गणेश नाईक यांनी स्वीकारला वनमंत्री पदाचा पदभार

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Dec 26, 2024

मुंबई ।राज्याच्या वन खात्याचा पदभार आज लोकनेते नामदार गणेश नाईक यांनी मंत्रालयात स्वीकारला.

 वन खात्यासंबंधी जनसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक आणि वरिष्ठ वन अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतानाच 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणे शंभर दिवसांचा विकासाचा कृती आराखडा तयार केला आहे त्याच पार्श्वभूमीवर शंभर दिवसांचा वनखात्याचा कृती कार्यक्रम तयार केल्याची माहिती ही त्यांनी दिली. वन खात्याचा पदभार स्वीकारण्यापूर्वी नामदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वनखात्यासंबंधी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.

 राज्यामध्ये कागदाचे उत्पादन वाढविण्यासाठी बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यात येईल. केंद्र सरकारने देशात बांबूची लागवड वाढवण्यासाठी तज्ञ अभ्यास समिती नियुक्त केली आहे. या समितीचे मार्गदर्शन या अनुषंगाने घेण्यात येईल, असेही वनमंत्री नामदार गणेश नाईक म्हणाले. गाव आणि वन खात्याच्या संयुक्त प्रयत्नातून वनक्षेत्राचे व्यवस्थापन करण्यावर भर देण्यात येईल. प्राण्यांचा अधिवास सुरक्षित ठेवून मानवावरील वाघांचे वाढते हल्ले थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. 

 तत्पर कार्यवाही...

  बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी वनमंत्री नामदार गणेश नाईक यांना दूरध्वनी करून त्यांच्या मतदारसंघात बिबट्या तसेच बंगाल टायगर्स यांचा वावर वाढला असल्याची माहिती दिली असता तात्काळ चौकशी करून उपाययोजना करण्याच्या सूचना वन मंत्री गणेश नाईक यांनी वन अधिकाऱ्यांना दिल्या.