नवी मुंबई .नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आयोजित ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. ड्रग्स फ्री समाज घडविण्यासाठी तरुणांनी सजग राहा तसेच सैनिक म्हणून पुढे या, हीदेखील एक प्रकारची देशभक्ती व समाजसेवा आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ड्रग्समुळे स्वतःच्या आयुष्यासोबत आपण देशाचेही नुकसान करतो. प्रवाहासोबत जाणारे अनेक असतात, परंतू चांगले कार्य करण्यासाठी प्रवाहाविरुद्ध जावे लागते, त्यासाठी मानसिक ताकद गरजेची असून याकरिता ‘नशामुक्त नवी मुंबई’ हे अभियान अतिशय महत्वाचे आहे. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आयोजित ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाची सुरुवात “Art of silence” या मूकनाट्याने झाली. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाच्या चित्रफितीच्या प्रकाशनाने संपन्न झाले. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, प्रख्यात अभिनेता व या उपक्रमाचे आयकॉन जॉन अब्राहम, आमदार मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, प्रशांत मोहिते, रश्मी नांदेडकर, संजयकुमार पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी, नशामुक्तीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आदी उपस्थित होते.