खड्ड्यात ॲम्बुलन्स आदळली आणि मृत घोषित केलेले आजोबा जिवंत झाले
कोल्हापूर। रस्त्यावरील खड्डे अनेकांसाठी जीवघेणे ठरतात, मात्र कोल्हापुरातील एका घटनेने याला अपवाद ठरवला आहे. कसबा बावडा येथील पांडुरंग उलपे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी सर्व तयारी सुरू असताना, घरी आणताना रुग्णवाहिका खड्ड्यात आदळली, आणि आश्चर्यकारकपणे तात्यांनी हालचाल केली.
सोळा डिसेंबरला हरिनामाचा जप करत असताना पांडुरंग तात्यांना हृदयविकाराचा झटका आला.रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी रात्री साडे अकरा वाजता मृत घोषित केले.ही बातमी परिसरात पसरल्यानंतर अंत्यविधीची तयारी सुरू करण्यात आली.
चमत्काराची घटना
रुग्णालयातून मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका रवाना झाली.मात्र, वाटेत रस्त्यावरील खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला, आणि पांडुरंग तात्यांच्या शरीरात हालचाल जाणवली.नातेवाईकांनी त्यांना पुन्हा रुग्णालयात नेले. उपचार सुरू होताच तात्या प्रतिसाद देऊ लागले आणि काही तासांत शुद्धीवर आले.सोमवारी तात्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज ते स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या घरात परतले आहेत. नातेवाईक आणि वारकरी मंडळींनी याला पांडुरंगाची कृपा मानली आहे.
पांडुरंग तात्यांच्या नातेवाईकांचे मत:
नातेवाईकांच्या मते, ही घटना देवाची कृपा असून हरिनामाचा प्रभाव असल्याचे ते मानतात. गावकरी आणि कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.रस्त्यांवरील खड्डे हे किती गंभीर समस्या आहेत हे वारंवार अधोरेखित झाले आहे. मात्र, या घटनेने खड्ड्याचा वेगळाच अनुभव दिला. पांडुरंग तात्यांच्या पुनर्जन्माची कथा कोल्हापूर परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.