कामगार संघटनेला चर्चेअंती आवाहन – सद्यस्थितीत आंदोलन स्थगीत करीत असल्याचे संघटनेकडून जाहीर

  • Admin
  • नवी मुंबई
  • Feb 10, 2025

नवी मुंबई ।नवी मुंबई महानगरपालिकेत विविध सेवेत बाह्यस्त्रोताव्दारे कार्यरत कर्मचारी यांच्या मागण्यांबाबत नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सकारात्मक पावले उचललेली असल्याने समाज समता कामगार संघ (नवी मुंबई) यांच्यामार्फत जाहीर करण्यात आल्याप्रमाणे त्यांनी 10 फेब्रुवारीपासून आंदोलन करू नये असे आवाहन काल 9 फेब्रुवारी रोजी रात्रीच महापालिका प्रशासनाच्या वतीने संबधितांना करण्यात येऊन तशाप्रकारे पत्राव्दारे सूचित करण्यात आले होते.

तथापि बाह्यस्त्रोताव्दारे कार्यरत समाज समता कामगार संघाशी संबधित कर्मचा-यांनी आज सकाळपासूनच स्वच्छतेच्या दैनंदिन कामाला सुरुवात न करता आंदोलनाची भूमिका घेत ठिकठिकाणी कामामध्ये अडथळा आणण्याचे प्रयत्न केले. यामुळे स्वच्छता, पाणीपुरवठा यासारख्या अत्यावश्यक दैनंदिन सुविधांमध्ये अडथळा येऊ नये व नागरिकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने महापालिका प्रशासनाने बाह्यस्त्रोताव्दारे सेवा पुरविणा-या पुरवठादारांस पर्यायी व्यवस्था कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांनी पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला असता या संघटनेशी संबधित बाह्यस्त्रोतव्दारे कार्यरत कर्मचा-यांनी त्या पर्यायी व्यक्तींना काम करण्यापासून रोखून तसेच वेगवेगळया प्रकारे कचरा संकलन व वाहतूक वाहने बंद पाडून कामात विविध प्रकारे अडथळा आणला.

समाज समता कामगार संघ यांच्या विविध मागण्यांबाबत महानगरपालिका प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली असून वेळोवेळी त्यांना याबाबतची माहितीही दिलेली आहे. तरीही त्यांनी बेमुदत आंदोलन सुरु केल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये व या आंदोलनात बाह्यस्त्रोताव्दारे कार्यरत कर्मचा-यांचे नाहक नुकसान होऊ नये यादृष्टीने कामगार हिताचा विचार करुन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आज पुन्हा सदर संघटनेच्या पदाधिका-यांशी चर्चा केली व त्यांना महानगरपालिका कामगारांच्या हितासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत याविषयी महानगरपालिकेने आत्तापर्यंत केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.

नवी मुंबई महानगरपालिकेने याकरिता दि. 7 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नियुक्त केली असल्याचे संघटनेच्या पदाधिका-यांना सूचित करण्यात आले व त्याबाबतचे पत्रही त्यांना देण्यात आले. सदर समितीची पहिली बैठक दि.12 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली असून 2 महिन्यांच्या कालावधीत अहवाल सादर करण्यासाठी विनंती समितीला करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. त्या बैठकीत समाज समता कामगार संघ तसेच इतर सर्व कामगार संघटना यांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहून आपले म्हणणे मांडण्याचे सूचित करण्यात आले आहे.

त्यामुळे महानगरपालिका कामगार हिताची भूमिका ठेवून सकारात्मक कार्यवाही करीत असताना शहरातील अत्यावश्यक सेवा विस्कळीत करण्याची भूमिका ठेवून आंदोलन करणे हे अयोग्य आहे असे स्पष्ट करीत महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कोणत्याही प्रकारे आंदोलन करू नये असे पुन्हा एकवार संघटनेच्या पदाधिका-यांना आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार सद्यस्थितीत सदर आंदोलन स्थगीत करण्यात येत असल्याचे संघटनेच्या पदाधिका-यांनी जाहीर केले आहे.