
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
नवी मुंबई - नेरूळ रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम बाजू कडील पदपथ आणि रस्त्यावर बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरुद्ध नेरूळ विभाग कार्यालयामार्फत धडक मोहीम घेण्यात आली होती. या वेळी फेरीवाल्यांनी या मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करून कर्मचाऱ्यांना धमकी दिली. त्यामुळे महापालिकेच्या वतीने नेरूळ पोलीस ठाण्यात फेरीवाल्यांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पारू, जयश्री आणि आणखी एक महिला फेरीवाले यांचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
नेरूळ विभाग कार्यालयामार्फत नियमितपणे पदपथ आणि रस्त्यावर बसणारे अनधिकृत फेरीवाले हटवण्याची मोहीम घेतली जाते. त्याच प्रमाणे सामासिक जागेचा वापर करणाऱ्या ६ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. नेरूळ रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम बाजू कडील पदपथावर प्रतिदिन विना परवाना फेरीवाले बसत असतात. काल या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी नेरूळ विभाग कार्यालयातील अतिक्रमण विरोधी विभागाचे अधिक्षक मच्छिंद्र विधाटे, अन्य कर्मचारी आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गेले होते. या वेळी फेरीवाले हटवण्याचे काम चालू असताना काही मुजोर महिला फेरीवाल्यांनी पालिकेच्या महिला सुरक्षा रक्षकांवर धाऊन जाण्याचा प्रयत्न केला. तसेच "आम्ही याच ठिकाणी बसणार, तुम्हाला काय करायचे ते करा. तुम्हाला बघून घेऊ" अशी धमकी देऊन शासकिय कामकाजात अडथळा निर्माण केला. दरम्यान फेरीवाले आणि मनपा कर्मचारी यांच्यात बाचाबाची होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेताना एका व्हिडिओ मध्ये दिसत आहे. त्यामुळे पोलिसांच्या मूक भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
अखेर पालिका कर्मचाऱ्यांनी कठोर कारवाई करून पदपथ आणि रस्ते मोकळे केले. त्यानंतर कारवाईत अडथळा आणणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध रात्री उशिरापर्यंत नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम करण्यात आले.