गर्भधारणापूर्व व प्रसुतिपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदयाच्या कार्यशाळेस डॉक्टरांचा उत्तम प्रतिसाद

  • Admin
  • नवी मुंबई
  • Feb 21, 2025

 नवी मुंबई|केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात गर्भधारणापूर्व व प्रसुतिपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंधकायदा 1994 व सुधारित 2003 (PCPNDT Act) ची अंमलबाजावणी करण्यात येते. सदर कायदयाची अंमजबजावणी, पर्यवेक्षण, व नियंत्रण प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने शासनामार्फत आरोग्य विभागामध्ये वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांना समुचित प्राधिकारी म्हणुन नियुक्त केले आहे.

          सदर कायदयांतर्गत सोनोग्राफी सेंटरकौन्सिलींग सेंटरजेनेटिक लॅबोरेटरीजेनेटिक क्लिनिक, सी.टी.स्कॅन, एम.आर.आय. व पेट सिटी स्कॅन इत्यादी सुविधांची नोंदणी करण्यात येते. सद्यस्थितीत नमुंमपा कार्यक्षेत्रात एकूण 190 पीसीपीएनडीटी नोंदणीकृत सेंटर्स कार्यरत आहेत. सदर सेंटर्सची वैद्यकीय अधिकारी ना.प्रा.आ. केंद्र यांच्यामार्फत नियमितपणे त्रैमासिक तपासणी व एफ फॉर्म ऑडीट करण्यात येते.

          नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये या कायदयाची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरिता नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून नवीन सेंटर्समार्फत  https://app.nmmconline.in/ या वेबसाईटवर अर्ज प्राप्त होत आहेत.

         याचाच एक भाग म्हणून नमुंमपा आरोग्य विभागामार्फत पीसीपीएनडिटी सेंटरधारक,  क्ष-किरणतज्ञ (Radiologist) व स्त्रीरोगतज्ञ (Gynaecologist) यांच्याकरिता 18 फेब्रुवारी रोजी डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटल येथे गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा 1994 व सुधारित 2003 या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

          या कार्यशाळेकरिता नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा समुचित प्राधिकारी डॉ.प्रशांत जवादे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण, डॉ. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.राजीव राव, रेडिओलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.विवेक जगताप, गायनॅकोलॉजिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.राहुल वाणी, महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. शैलेश संघानी तसेच नमुंमपा अंतर्गत कार्यरत असलेल्या पीसीपीएनडिटी सल्लागार समितीचे सदस्य डॉ. राजेश म्हात्रे, डॉ. उद्धव खिलारे, ॲड. अभय जाधव, डॉ. लक्ष्मण थडाणी उपस्थित होते.

          यावेळी नमुंमपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा समुचित प्राधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांनी संवाद साधताना या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला तसेच सर्व पीसीपीएनडिटी सेंटरधारक,  क्ष किरणतज्ज्ञ (Radiologist) व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना आवाहन केले. सदर कायदा पालन करण्याचे महत्व, प्रत्येकाची जबाबदारी व कायदयाचे गांभीर्य याविषयी माहिती देत डॉ.प्रशांत जवादे यांनी गर्भलिंग निदान होणे हे भविष्यासाठी सामाजिकदृष्ट्या घातक असून यामुळे स्त्री-पुरूष समानतेमध्ये असमतोल निर्माण होईल हे लक्षात घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असे होत असल्याचे दिसून आल्यास किंवा समजल्यास अशी चूक अक्षम्य आहे याचे भान सर्वांनी  राखावे  आणि हा एक सामाजिक अपराध आहे याबाबतच्या गंभीरतेची उपस्थितींना जाणीव करून दिली. अशा प्रकारच्या समाजविघातक चुकीला क्षमा नाही असे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळी दिले.

          या कार्यशाळेमध्ये नमुंमपा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण यांनी उपस्थित सर्वांना पीसीपीएनडिटी  कायदयातील महत्वाचे नियम व कलमांची माहिती दिली.  सेंटरमध्ये अपेक्षित संपूर्ण रेकॉर्ड, कायदयातील दंडात्मक तरतुदी, कायदयातील आचारसंहीता (code of Conduct) तसेच सेंटर धारकाने करावयाच्या व न करावयाच्या बाबी (Do’s and Don’ts) तसेच ए.आर.टी व सरोगसी कायदा याविषयी सादरीकरणासह माहिती दिली.

          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सीबीडीच्या वैद्यकिय अधिकारी डॉ अर्चना तायडे यांनी केले तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ विश्वास परुळेकर यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ विवेक जगताप व डॉ चेतन सिंघल  यांनी विशेष प्रयत्न केले. अखेरीस प्रश्न-उत्तराचे सत्र होऊन यामध्ये उपस्थितांनी पीसीपीएनडीटी कायद्याबद्दल प्रश्न विचारले व यावर डॉ.प्रशांत जवादे व डॉ.रत्नप्रभा चव्हाण यांनी शंकासमाधान केले. या कार्यशाळेस 200 पेक्षा जास्त संख्येने डॉक्टर्स उपस्थित होते.

         नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लिंग गुणोत्तर प्रमाण यामध्ये समतोल रहावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये अवैध गर्भपात व छुप्या मार्गाने गर्भलिंग निदान होत असल्याचे निदर्शनास आल्यास http://amchimulgimaha.in या संकेतस्थळावर किंवा 18002334475 टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. माहिती देणा-या खबरी व्यक्तीच्या नावाची गुप्तता राखली जाईल आणि गुन्हा सिध्द झाल्यानंतर (शासन अटी व शर्तीनुसार) रोख रुपये 1,00,000/- (एक लाख मात्र ) बक्षीस रक्कम माहिती देणा-यास देण्यात येईल.

         नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लिंग गुणोत्तर प्रमाण राखण्याकरिता व स्त्री भ्रूण हत्या रोखण्याकरीता प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून http://amchimulgimaha.in या संकेतस्थळावर किंवा 18002334475 टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.