वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या जनता दरबारात 250 निवेदने सादर

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Feb 28, 2025

 65 टक्के निवेदनांवर तात्काळ कार्यवाही 

नवी मुंबई ।राज्याचे वने मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांचा नवी मुंबईतील दुसरा जनता दरबार आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला. शिक्षण, आरोग्य, नागरी सोयी-सुविधा, अन्यायकारक प्रशासकीय कारवाई याबद्दलच्या व अन्य विषयांवर नागरिकांनी आपली निवेदने सादर केली. यापैकी 65 टक्के निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्यात आला.

 3 फेब्रुवारी 2025 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये पहिला जनता दरबार घेण्यात आला. त्यामध्ये 400 पेक्षा अधिक निवेदने सादर करण्यात आली होती. या निवेदनांवर करण्यात आलेली कार्यवाही संबंधित अर्जदारांना अवगत करून देण्यात येते आहे. विशेष करून पहिल्या जनता दरबारामध्ये पोलीस विभागाशी संबंधित 85 निवेदने सादर करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाने त्यावर जलद गतीने कार्यवाही करीत या प्रकरणांचा निपटारा केला आहे. नवी मुंबईनंतर पालघर येथे एक वेळा आणि ठाणे येथे एक वेळा जनता दरबार संपन्न झाला. नवी मुंबईतील पुढील जनता दरबार 4 एप्रिल 2025 रोजी, पालघर येथील जनता दरबार 7 एप्रिल 2025 रोजी तर ठाण्यातील जनता दरबार 11 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. 

 महापालिका, सिडको, एमआयडीसी, पोलीस, महसूल, परिवहन, वन विभागासह विविध शासकीय खात्यांचे वरिष्ठ अधिकारी आजच्या जनता दरबारात उपस्थित होते. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक उपस्थित होते. 250 नागरिकांनी आपल्या समस्या, निवेदने मांडली, त्यापैकी अनेक समस्यांचे तात्काळ निराकरण उपस्थित संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना करून करण्यात आले. अनेक प्रकरणांमध्ये वने मंत्री नामदार गणेश नाईक यांनी निवेदनाशी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. तर उर्वरित समस्या कालबद्धरित्या सोडविण्यात येणार आहेत. काही समस्या मंत्रालयीन आणि जिल्हास्तरावर बैठका घेऊन मार्गी लावण्यात येणार आहेत. सकाळी 11 वाजता सुरू झालेला हा जनता दरबार सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत सुमारे आठ तास सुरू होता. जनतेच्या समस्या प्रलंबित न ठेवता त्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश यावेळी नामदार गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले. करावे येथील सर्वसामान्यांच्या घरांवरील अन्यायकारक कारवाई थांबविण्याचे आदेश देताना 1995 पूर्वीच्या घरांना राज्य शासनाने अभय दिल्याचे स्पष्ट केले. बेलापूर सेक्टर 15 येथील रहिवासी भागातून खारघर ते नेरूळ जेट्टी हा कोस्टल रोड नेण्याचे सिडकोचे नियोजन आहे. या विरोधात येथील रहिवाशांनी निवेदन दिले असता महापालिकेचे अतिरिक्त नगर अभियंता अरविंद शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून गांभीर्याने हा विषय सिडको प्रशासनाकडे उपस्थित करण्याची सूचना केली. रहिवासी भागातील शांतता नष्ट होता कामा नये असे स्पष्ट करून याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक आयोजित करून चर्चा करू अशी ग्वाही बेलापूरच्या रहिवाशांना दिली. बेलापूर येथे विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिडकोकडे गतिमान पाठपुरावा करून सुविधांचे भूखंड हस्तांतरित करून घ्यावे, अशी सूचना देखील त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली. नवी मुंबई महापालिका आणि परिवहन विभागातील विविध संवर्गामधील कंत्राटी कामगारांनी देखील जनता दरबारात नामदार गणेश नाईक यांची भेट घेतली. त्या कामगारांनी त्यांना सेवेत कायम करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. त्यावर हे कामगार वर्षानुवर्ष कंत्राटी, ठोक मानधन पद्धतीने कार्यरत आहेत. महापालिका त्यांच्याकडून सेवा घेते आहे. त्यांचे वय निघून चालले आहे, त्यामुळे त्यांना कायम केले पाहिजे, असे सांगितले. जनता दरबारामध्ये दिव्यांग बांधवांनी देखील आपल्या समस्या मांडल्या. त्यावर या घटकांना तत्परतेने मदतरुपी दिलासा देण्यात आला. जनता दरबारामध्ये आल्यावर आमच्या अडचणी मार्गी लागतात, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.