
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
तपास कोणाच्याही दबावाखाली न करता निष्पक्षपणे करावा
माजी आमदार संदीप नाईक यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई । सीबीडी-बेलापूर सेक्टर आठ येथील आर्टिस्ट व्हिलेज रोडवर डंपर चालकाच्या निष्काजीपणामुळे शिवम भट या बारा वर्षीय निष्पाप मुलाचा मृत्यू झाला होता. 5 फेब्रुवारी 2025 रोजी शिवमच्या सायकलला डंपर चालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
शिवम मृत्यू प्रकरणी माजी आमदार संदीप नाईक ( sandeep naik ) यांनी आज नवी मुंबईचे (navi mumbai police ) पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी शिवमचे कुटुंबीय देखील त्यांच्या समवेत उपस्थित होते. ही दुर्घटना घडली तेव्हा सीबीडी- बेलापूर पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली त्याचबरोबर या दुर्घटनेप्रकरणी आरोपीवर योग्य ती कलमे देखील लावली गेलेली नाहीत, असे शिवम भटच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. शिवमच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला डंपर चालक अवघ्या 21 वर्षाचा असून त्याला डंपर व्यवस्थित चालविता येत नसल्याचे दिसून आले आहे. त्याच्या निष्काळजीपणामुळे आणि हलगर्जीपणामुळेच शिवमचा मृत्यू झालेला आहे. परंतु या सर्व प्रकरणाचा तपास कोणाच्यातरी दबावाखाली होत असल्याचा आरोप शिवमच्या कुटुंबीयांनी केला आहे. माजी आमदार संदीप नाईक यांनी याप्रकरणी सखोल, पारदर्शक आणि कुणाच्याही दबावाखाली न येता तपास करावा. शिवम भटच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा. शिवमच्या मृत्यूस कारणीभूत सर्वांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. पोलीस आयुक्त भारंबे यांनी शिवमच्या मृत्यूप्रकरणी निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाची ग्वाही माजी आमदार संदीप नाईक यांना दिली.