राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे सावरकर एकमेवाद्वितीय - रवींद्र नेने, स्वा. सावरकर अभ्यासक

नवी मुंबई - राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर एकमेवाद्वितीय असल्याचे प्रतिपादन स्वा. सावरकर यांचे अभ्यासक रवींद्र नेने यांनी वाशी येथे एका कार्यक्रमात केले.

मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ आणि प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ६० व्या पुण्यतिथी निमित्ताने "जयोस्तुते" या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी आणि वसंत आजगावकर यांनी स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ओजस्वी आणि प्रेरणादायी जीवनाची स्मरणगाथा संगीतमय कवितांच्या माध्यमातून सादर करण्यात आल्या.

ज्येष्ठ गायक संगीतकार वसंत आजगावकर, त्यांचे सुपुत्र व गायक निनाद आणि निनाद यांची कन्या निरजा अशा तीन पिढ्यांनी संगीतमय स्मरणगाथा सादर केली. याची संकल्पना आणि लेखन प्रभाकर अत्रे यांचे होते. मिलिंद परांजपे, कौस्तुभ दिवेकर, व्यंकटेश कुलकर्णी, मकरंद नाईक आणि शाश्वती आजगांवकर यांनी कोर्स आणि विविध सुमधुर वाद्यांच्या माध्यमातून साथ दिली.

रवींद्र नेने पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटले की सर्वांच्या अंगामध्ये एक सळसळणारे रक्त वहायला लागते. 

हे मातृभूमि तुज मन अर्पियेले

वक्तृत्व वाक्-विभव ही तुज अर्पियेले

तुंतेंची अर्पिली नवी कविता वधूला

लेखां प्रति विषय तूची अनन्य झाला ll

त्वत्-स्थंडिली ढकलली गृह-वित्त-मत्ता

दावानालात वहिनी नव-पुत्र-कांता

त्वत्-स्थंडिली अतुल-धैर्यनिष्ठ बंधू

केला हवि परम कारुण पुण्यसिंधू ll

या कवितेच्या माध्यमातून स्वा. सावरकर म्हणतात हे मातृभूमि माझ्याकडे जे जे होते ते सर्व तुला अर्पण केले आहे. माझे तन मन आणि धन इतकेच नव्हे, तर नातेवाईक, मुल हेही तुला अर्पण केले आहे. हे सांगणारे सावरकर एकमेवाद्वितीय होत. अशा क्रांतिकारकांची ही "स्मरण गाथा" सर्वांना सदैव प्रेरणादायी असणार आहे.

सावरकर यांच्या अनेक प्रेरणादायी कविता काही प्रसिद्ध, तर काही अप्रसिद्ध आहेत. यातून सध्याच्या पिढीने राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती कशी असावी हे शिकणे आवश्यक आहे, असे रवींद्र नेने म्हणाले.