उलवेमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; प्रेयसीसह प्रियकर नाशिकहून अटकेत

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Apr 06, 2025

नवी मुंबई। उलवे येथील वहाळ गावात राहणाऱ्या संजय पांडे (वय ४०) या तरुणाची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. संजय पांडे हे गाडी चालवण्याचे काम करत होते.


प्राथमिक माहितीनुसार, एका महिलेन तिच्या प्रियकरासह आणखी दोन जणांच्या मदतीने संजय यांच्यावर प्रथम हातोड्याने डोक्यावर प्रहार केला. ते अजूनही उभे राहिल्याने पुन्हा डोक्यावर वार केले गेले. इतक्यावर न थांबता त्यांच्या डोळ्यांवरही हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह गादीत गुंडाळून घरात बंद करून संजय यांची गाडी घेऊन पसार झाले. आरोपी पुण्याला गेले असता तिथे गाडीचा अपघात झाला. गुरुवारी सकाळी आरोपींनी संजयच्या मोबाईलवरून त्यांच्या भावाला मेसेज करून "अपघात झाला आहे, तीन हजार रुपये पाठवा" अशी मागणी केली. मात्र फोन न उचलल्याने संदेह निर्माण झाला आणि उलवे पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली.

शनिवारी आरोपी नाशिकला पोहोचले आणि तिथेही गाडीचा अपघात झाला. पोलिसांसमोर प्रेयसी व प्रियकराने आत्मसमर्पण करत हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी याबाबतची माहिती उलवे पोलिसांना दिली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन एमजीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.