
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
बाईक अपघातात उद्योजकपुत्राचा मृत्यू
आजरा | प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा-आंबोली महामार्गावर देवर्डे मादाळ तिट्टा या धोकादायक वळणावर रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूरच्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा एकुलता एक मुलगा सिद्धार्थ विलास रेडेकर (वय २२) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे अपघातावेळी त्याच्या डोक्यावर तब्बल ७० हजार रुपयांचं अत्याधुनिक हेल्मेट होतं, तरीही त्याचा जीव वाचला नाही.
सिद्धार्थ रेडेकर हा आर्किटेक्चरचा विद्यार्थी होता आणि बाईक रायडिंग व फोटोग्राफीचा छंद जोपासत होता. रविवारी तो आणि त्याचे चार मित्र आंबोलीकडे बाईक रायडिंगसाठी गेले होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने परतताना देवर्डे मादाळ तिट्टा परिसरात त्याच्या बाईकला समोरून येणाऱ्या तवेरा गाडीची जोरदार धडक बसली. धडक एवढी जबरदस्त होती की सिद्धार्थच्या डोक्यावरील हेल्मेटचे दोन तुकडे झाले आणि ते रस्त्याच्या कडेला फेकले गेले.
या अपघातात सिद्धार्थच्या डोक्याला, छातीला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने गडहिंग्लजमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
सिद्धार्थकडे १२ लाखांची महागडी बाईक होती आणि तो अत्याधुनिक सुरक्षा उपकरणांचा वापर करत होता. तरीही हा दुर्दैवी अपघात त्याचं आयुष्य घेऊन गेला. त्याच्या हेल्मेटवर एक कॅमेरा देखील होता. अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास करण्यासाठी या कॅमेऱ्यातील फुटेज तपासण्यात येणार आहे.