नवी मुंबईत गुरुनाथ चिचकर आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा; पोलीस कर्मचारीसह ३ जण ताब्यात

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Apr 28, 2025

नवी मुंबई : बेलापूर येथील बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्येप्रकरणी नवी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. खारघर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी सचिन भालेराव आणि अन्य दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) ही कारवाई केली.

गुरुनाथ चिचकर यांनी दोन दिवसांपूर्वी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. तपासादरम्यान सचिन भालेराव याचे गुरुनाथ चिचकर यांच्याशी सातत्याने संपर्क असल्याचे समोर आले. तपासाची चाहूल लागताच भालेराव गावात पळून गेला होता, मात्र गुन्हे शाखेने त्याला तिथून अटक केली.

दरम्यान, गुरुनाथ चिचकर यांचा मुलगा नवीन चिचकर हा एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नेरुळ सेक्टर १५ मधील कारवाईत अंमली पदार्थ विभागाने लाखो रुपयांच्या ड्रग्जसह चार जणांना अटक केली असून चार जण फरार आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी नेरुळ परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.