नवी मुंबईत इंफ्राटेक लॅंड्सकडून महाठगी

  • Admin
  • महाराष्ट्र
  • May 10, 2025

किसन राठोडसह कर्मचाऱ्यांविरुद्ध ८० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

नवी मुंबई, ९ मे २०२५:स्वप्नातील घर कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या इंफ्राटेक लॅंड्स कंपनीच्या ( Infratech ) मालक किसन राठोड ( Kisan Rathod ) आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात ८० लाख रुपयांहून अधिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात अजून अनेक पीडित पुढे येत असून, फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणाचा उलगडा मुंबईतील केईएम रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिलेनं तक्रार दिल्यानंतर झाला. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२३ मध्ये त्यांनी टीव्हीवर इंफ्राटेक लॅंड्सचा एक जाहिरात पाहिली होती, ज्यामध्ये “फक्त २ लाखांपासून प्लॉट” अशी आकर्षक ऑफर देण्यात आली होती. कंपनीचं ऑफिस बेलापूर सेक्टर ११ येथील पुजीत प्लाझा इमारतीत असल्याचं सांगण्यात आलं होतं.

संबंधित महिला आणि त्यांचे पती ऑफिसमध्ये गेले असता, कंपनीचा एक कर्मचारी त्यांना चिर्ले जंक्शनजवळील विंधने गावाजवळ नेऊन दूरवरून एक जमीन दाखवली आणि पावसामुळे दलदल असल्याचे कारण देत पुन्हा ऑफिसमध्ये परत आणले. नंतर विविध ऑफर्स आणि सवलतींच्या आमिषाने त्यांच्याकडून हळूहळू ११ लाख ६० हजार रुपये उकळले. पुढे तपास करताना संबंधित महिलेला लक्षात आले की, अशाच प्रकारे इतर ओळखीच्या लोकांनाही फसवले गेले आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवार आणि शुक्रवारच्या दिवशी आणखी काही पीडितांनी पुढे येऊन पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. याआधारे पोलिसांनी किसन राठोड आणि इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कुणी आणखी या प्रकारात फसवले गेले असतील तर त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी, जेणेकरून दोषींवर कठोर कारवाई करता येईल.