वरिष्ठ पोलीस निरीक्षक 1 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अडकला

  • Admin
  • महाराष्ट्र
  • May 14, 2025

मुंबई | मुंबईतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव मधुकर देशमुख (वय 57) यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

तक्रारदार हे एका शैक्षणिक ट्रस्टचे ट्रस्टी असून, 15 ऑगस्ट 2024 रोजी त्यांच्या शाळेच्या गेटचे कुलूप तोडून काही जणांनी परिसरात जबरदस्तीने प्रवेश केला होता. यासंदर्भात तक्रारदारांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि धर्मादाय आयुक्त, बृहन्मुंबई यांच्याकडे तक्रार दिली होती. संबंधित प्रकरणात पोलीस संरक्षण आणि विरोधकांना ट्रस्टच्या परिसरात प्रवेश न देण्याच्या मोबदल्यात आरोपी पोलिस निरीक्षकाने तक्रारदाराकडे ₹3,00,000/- लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने यास ACBकडे तक्रार दाखल केली होती. पडताळणी दरम्यान आरोपीने तडजोडीअंती ₹2,50,000/- वर सहमती दर्शवली आणि पहिला हप्ता ₹1,00,000/- स्वीकारताना आज दिनांक 13 मे 2025 रोजी त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. सदर सापळा कारवाई यशस्वी ठरली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ACBच्या या कारवाईने पोलीस यंत्रणेमधील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.