वृक्षछाटणीसाठी २०० रुपये शुल्क रद्द होणार? आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच

  • Admin
  • नवी मुंबई
  • Jun 14, 2025

नवी मुंबई | प्रतिनिधी

नवी मुंबई महानगरपालिकेकडून वृक्षछाटणीसाठी प्रस्तावित २०० रुपयांच्या शुल्कावर आता फेरविचार होण्याची शक्यता आहे. काल (दि. १३ जून) रोजी माजी नगरसेवक विलास डोळस यांची नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याशी उद्यान विभागासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी प्रॉपर्टी टॅक्ससोबतच वृक्षकर आधीच आकारला जात असल्याने, नव्याने २०० रुपये शुल्क आकारणे उचित नाही, असे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.या चर्चेदरम्यान आयुक्त शिंदे यांनी हा शुल्कवाढीचा निर्णय लवकरच पुनरविचाराधीन असल्याचे स्पष्ट केले.

ऑनलाइन परवानगी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी

वृक्षछाटणीसाठी ४-४ महिने परवानगी न मिळाल्याच्या तक्रारींबाबत आयुक्तांकडे निष्क्रिय अधिकाऱ्यांकडून अधिकार काढून ऑनलाइन परवानगी प्रक्रिया सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे. या प्रस्तावावर आयुक्त विचार करत असल्याचे सांगण्यात आले.

उद्यान विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी

मनपाकडून निवडण्यात आलेल्या कंत्राटदारांमार्फत उद्यान देखभाल केली जात असली तरी अनेक अडचणी कायम आहेत. यामध्ये –

नियमित स्वच्छतेचा अभाव

झाडांची योग्य लागवड न होणे

खेळण्यांची वेळेवर दुरुस्ती न होणे

अपुरे मनुष्यबळ

अशा समस्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. यावर उत्तर देताना आयुक्तांनी सांगितले की, या कारणांमुळेच कंत्राटदारांच्या दरांमध्ये कपात करण्यात आली आहे.

निष्क्रिय अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई

तक्रारी असूनही दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही आयुक्त कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

— विशाल राजन डोळस

मा. नगरसेवक, नवी मुंबई महानगरपालिका