
महापे-शिळफाटा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- Aug 30, 2025
“स्वच्छतेतून आरोग्य, आरोग्यासाठी योग” या संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रम यशस्वी
नवी मुंबई।नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सिडको व द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त सहकार्याने आज वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. या उपक्रमात विविध वयोगटांतील 5,000 हून अधिक आरोग्यप्रेमी नागरिकांनी सहभाग घेत योगसाधनेचा अनुभव घेतला.
या योगदिन कार्यक्रमास राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक, बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू शुभम वनमाळी, तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या शिलादिदी, द आर्ट ऑफ लिव्हिंगचे हनुमंत शिंदे, योग प्रशिक्षक प्रमोद कोकणे व दीप्ती देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचा योगाच्या भूमिकेवर भर
कार्यक्रमात बोलताना मंत्री गणेश नाईक म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगदिनाचे जागतिकीकरण करत योगाचा जागर केला. मानसिक शांती व शरीर सुदृढ ठेवण्यासाठी रोजच्या जीवनशैलीत योगाचा अविभाज्य भाग असावा.”
आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गेल्या 11 वर्षांपासून नवी मुंबईत योगदिन साजरा होत असल्याचा अभिमान व्यक्त केला. “युवा वर्गात योगाबद्दल वाढता उत्साह हा आरोग्यदृष्ट्या शुभ संकेत आहे,” असे त्या म्हणाल्या.
स्वच्छता, योग व पर्यावरणाचे एकत्रीकरण
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांनी फक्त शरीर नव्हे तर मनही स्वच्छ ठेवण्यासाठी योग दिन उपयुक्त असल्याचे सांगितले.विशेष म्हणजे, वस्त्र मंत्रालय व मनपाच्या वस्त्र पुनर्निर्माण केंद्रात तयार करण्यात आलेल्या पुनर्वापरित योगा मॅट्सवरच मान्यवरांनी योगासने केली.यावेळी पुनर्निर्मित वस्त्रांपासून तयार केलेली ‘योग संदेश देणारी गोधडी’ सुद्धा प्रदर्शित करण्यात आली होती.
‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या घोषवाक्यावर आधारित साजरा
या वर्षीचा योग दिन ‘Yoga for One Earth, One Health’ या संकल्पनेवर आधारित साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे-पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे डॉ. अजय गडदे व स्मिता काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.प्रत्येक मान्यवरांचे पर्यावरणस्नेही वृक्षरोपांनी स्वागत करण्यात आले.
‘स्वच्छता अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानाची पूर्वतयारी
1 जुलैपासून सुरू होणाऱ्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विशेष स्वच्छता अभियानाची पूर्वतयारी या योग कार्यक्रमातून करण्यात आली.
नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग द्यावा, असे आवाहनही करण्यात आले.