नवी मुंबई : स्वच्छतागृहांची दुरवस्था, ‘स्मार्ट टॉयलेट’ प्रस्तावावर नागरिकांचा सवाल

  • Admin
  • नवी मुंबई
  • Aug 06, 2025

नवी मुंबई।स्वच्छ सर्वेक्षणात देशात तिसरा क्रमांक मिळवलेल्या नवी मुंबई महापालिकेने ( Navi Mumbai Municipal corporation ) शहरात ‘स्मार्ट टॉयलेट’ बसविण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, आधीच उभारलेल्या ई-टॉयलेट्स व पारंपरिक स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय दयनीय असून, त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


बेलापूर सेक्टर-१ मध्ये नव्याने बांधलेले मोठे स्वच्छतागृह सध्या वीजपुरवठा बंद, नळ-पाईप गायब, पाण्याची टंचाई आणि घाणीच्या साम्राज्यात पडले आहे. जुन्या स्वच्छतागृहाचे दरवाजे बंद असून, परिसरात दारूच्या बाटल्यांचे ढीग आणि अस्वच्छता पसरलेली आहे. ही ठिकाणे समाजकंटकांचे अड्डे बनल्याचा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केला.


महापालिकेकडे स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी ठेकेदार आणि पर्यवेक्षक असूनही शहरातील अनेक शौचालये बंद दरवाज्यांत किंवा घाणीत पडली आहेत. ऑनलाईन तक्रारी व हेल्पलाईनवर कळवूनही कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही बसवून सुरक्षितता वाढवावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.


सजग नागरिक मंचाचे प्रशासकीय सल्लागार ऍड. डॉ. विशाल माने म्हणाले, “स्मार्ट टॉयलेटची गरज आहे, पण आधी अस्तित्वात असलेल्या सर्व स्वच्छतागृहांचे नियोजन, देखभाल आणि व्यवस्थापन सक्षमपणे व्हायला हवे. अन्यथा नवीन प्रकल्पांचा शेवटही बंद दरवाजे आणि घाणीतील शौचालयांतच होईल.”