घणसोलीतील ऑरम सोसायटीच्या ७२० कुटुंबांवर एमआयडीसीचा अन्याय

  • Admin
  • नवी मुंबई
  • Dec 08, 2025

कमर्शियल पाणी दर रद्द करण्याच्या मागणीसाठी सोसायटीचे अध्यक्ष योगेश चव्हाण यांचे एमआयडीसी कार्यालयासमोर आमरण अनशन

नवी मुंबई : घणसोली येथील ऑरम सोसायटीमध्ये राहणाऱ्या ७२० कुटुंबांकडून पिण्याच्या पाण्यासाठी कमर्शियल दर आकारण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. निवासी क्षेत्रात राहूनही व्यावसायिक दराने पाणी देणे अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचे सांगत हा दर निवासी दरात बदलावा या मागणीसाठी सोसायटीचे अध्यक्ष योगेश चव्हाण यांनी एमआयडीसी कार्यालयासमोर आमरण अनशन सुरू केले आहे.चव्हाण यांनी स्पष्ट केले की, मागणी मान्य होईपर्यंत अनशन सुरूच राहील.

चव्हाण यांच्या मते, कमर्शियल दरामुळे दरमहा लाखों रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार नागरिकांवर पडत आहे. एमआयडीसीकडे अनेक वेळा तक्रारी आणि निवेदने देऊनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.

अनशनात सोसायटीतील नागरिकांसह शहरातील सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांचा मोठा सहभाग आहे. समर्थनकर्त्यांनी “निवासी दर लागू करा”, “आर्थिक शोषण थांबवा” अशा घोषणांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

दरम्यान, एमआयडीसी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, अनशन सुरू झाल्यानंतर या प्रकरणी सकारात्मक तोडगा शोधण्यासाठी चर्चा सुरू करण्यात आली आहे, परंतु निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय चव्हाण यांनी घेतला आहे.

या प्रकरणामुळे घणसोली परिसरातील पाणी दर निश्चितीची धोरणे, नागरिकांवरील आर्थिक भार आणि प्रशासनाची उदासीनता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, निवासी भागाला निवासी दर मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि त्यासाठी संघर्ष सुरू राहणार आहे.