नवी मुंबई ।पूर्व आमदार संदीप नाईक ( Sandeep Naik ) यांनी आज भारतीय जनता पार्टीत पुनः स्वगृहप्रवेश केला. हा प्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर संदीप नाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
संदीप नाईक यांच्या भाजपातील पुनःप्रवेशामुळे नवी मुंबई भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष व नवचैतन्य पाहायला मिळत आहे. विशेषतः नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रवेशामुळे भाजपाला निश्चितच बळकटी मिळणार आहे.
नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना संदीप नाईक यांनी शहरातील पक्षसंघटना भक्कम केली होती. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाने उल्लेखनीय यश संपादन केले. दोन वेळा आमदार राहिलेल्या संदीप नाईक यांनी नवी मुंबईत मजबूत जनाधार निर्माण केला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या अगदी आधी त्यांचा भाजपात पुनःप्रवेश झाल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
या प्रसंगी प्रतिक्रिया देताना संदीप नाईक म्हणाले,
“माझा सामाजिक आणि राजकीय प्रवास नेहमीच जनहित आणि नवी मुंबईच्या विकासाभोवती केंद्रित राहिला आहे. महाराष्ट्राचे विकासपुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन व पाठबळ मला सदैव लाभले आहे. भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माननीय वनमंत्री गणेश नाईक यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
ते पुढे म्हणाले,“आज देश, महाराष्ट्र आणि विशेषतः नवी मुंबई परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीच सर्वात सक्षम, स्थिर आणि दूरदृष्टी असलेला पर्याय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या मार्गावर अग्रसर आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातही विकासाची गती सातत्याने सुरू आहे. नवी मुंबईकरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि शहराच्या हितासाठी मी पुन्हा भाजपात सहभागी झालो आहे.”