वाशी अरेंजा कॉर्नर येथे ऑडी कारमधून नोटांनी भरलेली पिशवी जप्त

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Jan 09, 2026

वाशी अरेंजा कॉर्नर येथे निवडणूक आयोगाची नाकाबंदी, 

नवी मुंबई | वाशी येथील अरेंजा कॉर्नर परिसरात निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉड पथकाने नाकाबंदी दरम्यान एका ऑडी कारची तपासणी केली. तपासणीदरम्यान कारच्या डिकीत नोटांनी भरलेली पिशवी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

पथकाने तात्काळ सदर वाहन जप्त केले असून प्रकरणाच्या गांभीर्याचा विचार करता आयकर विभागाला पाचारण करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेची मोजणी तसेच तिचा वैध स्रोत याची तपासणी आयकर विभागामार्फत करण्यात येत आहे.

आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात कडक तपासणी व नाकाबंदी मोहीम राबविण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या वाहन चालकाची चौकशी सुरू असून रोख रकमेच्या स्रोतासंबंधी कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. आयकर विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.