सीवूड्स वाहतूक शाखेतर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम

  • Admin
  • नवी मुंबई
  • Jan 10, 2026

मोराज सिग्नल येथे विद्यार्थ्यांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे प्रबोधन

नवी मुंबई ।पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत सीवूड्स वाहतूक शाखेतर्फे गोदरेज प्रॉपर्टीज व ज्ञानदीप सेवा मंडळाची प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) विजय चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. मोहिनी लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) कोरडे, हवालदार त्र्यंबक डोंबाळे, चेतन पाटील, अनीश मनियर, योगेश तायडे तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाअंतर्गत ज्ञानदीप प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मोराज सिग्नल येथे उपस्थित राहून वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे तसेच चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्ट लावणे आवश्यक असल्याबाबत जनजागृती केली.

हेल्मेट परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांचा तसेच सीट बेल्ट लावणाऱ्या चारचाकी वाहनचालकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमाला वाहनचालकांकडून उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

या रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानात शाळेतील एकूण ४० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृतीत लक्षणीय वाढ झाली आहे.