महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री ‘अजित दादा’

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Jan 28, 2026

खेळ कुणाला दैवाचा हा कळला…

‘देवता’ सिनेमातलं हे अजरामर गाणं सांगून जातं—प्रत्येकाच्या आयुष्यात ‘दैव’ नावाचं कुणीतरी असतंच. पण ते दैव कधी, कुठे आणि कसं फासं टाकेल, याची कल्पनाही नसते.


सकाळची वेळ होती. अंघोळ करून आवराआवरी सुरू असतानाच बार्शीतून मित्राचा फोन आला. आवाज घाबरलेला होता.

“होय… त्यात अजित दादा होते का?”

मी चकित होऊन विचारलं, “कशात?”

“विमानात… बारामतीत पडलंय… तुमच्याच चॅनेलवर दाखवतायत.”


क्षणभर काहीच कळेना. “थांबा, थांबा,” म्हणत व्हॉट्सॲप ग्रुप उघडला. फोटो पाहताच पोटात गोळा आला. विमानातील सर्वच ६ जणांचा मृत्यू—हा मेसेज मन सुन्न करणारा होता. लगेच टीव्ही सुरू केला. काही वेळातच काळ्या स्क्रीनवर ती ओळ झळकली—

“अतिशय दु:खद बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन.”

आणि नकळत डोळे पाणावले.


तसं अजित दादांशी व्यक्तिगत ओळख नव्हती. पण बातम्यांमधून आम्ही त्यांना रोज भेटायचो—त्यांचं काम, त्यांचे विचार, त्यांचा रोखठोकपणा, रिल्समधला मिश्कीलपणा… अनेकदा आमच्या चर्चेचा विषय असायचा. गुलाबी जॅकेट, चेहऱ्यावर हलकंसं स्मित आणि कायम लगबगीत असलेले त्यांचे व्हिडिओ—हीच आमची त्यांच्याशी सध्याची ओळख, सध्याची मैत्री.


बार्शीत आमदार दिलीप सोपल यांच्या सभांसाठी आलेले अजित दादा प्रत्यक्ष पाहिल्याचंही आठवतं. काही दिवसांपूर्वीच बार्शीतील राजकीय घडामोडींवरून मित्र नाना थळकरीशी फोनवर चर्चा झाली होती. तेव्हा तो म्हणाला होता, “बार्शीचं अजित दादांशी भावनिक नातं आहे. गेल्या ३०-४० वर्षांचा जिव्हाळा आहे.” त्या शब्दांत बार्शी-अजित पवार संबंधांचा इतिहास होता.


वर्षभरापूर्वी डिजिटल मीडिया संघटनेच्या निमित्ताने अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर भेटीची वेळ सकाळी ७ वाजता मिळाली होती. ज्येष्ठ पत्रकार राजा माने सरांसह गेलो होतो. ग्रँट रोडवर टॅक्सी न मिळाल्याने मला थोडा उशीर झाला. तेव्हा संघटनेचे पदाधिकारी भेटून बाहेर येत होते. आत अजित दादा खुर्चीत बसलेले—पांढरा शुभ्र कुर्ता, हातात कागद, आणि सकाळी सकाळीच भेटीसाठी लागलेली मोठी रांग. हा होता कामाने झपाटलेला दादामाणूस.


दादांचा दिलखुलास आणि मिश्कील स्वभाव सर्वांनाच आपलासा वाटायचा. ओठात एक आणि पोटात एक असले नेते अजित दादा नव्हते. महायुतीच्या सत्तास्थापनेवेळी “मी तर उपमुख्यमंत्री होणार आहे बाबा…” असं मोकळेपणाने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मीडियासमोर सांगितल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं.


रुबाबदार, स्पष्टवक्ते, व्हिजनरी आणि मोकळ्या स्वभावामुळे भाजप कार्यकर्त्यांनीही दादांना स्वीकारलं होतं. माझा एक मित्र—कट्टर भाजप समर्थक—एकदा म्हणाला होता, “आमचं काहीही होऊ दे, पण अजित दादांना एकदा तरी मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे.” त्या शब्दांत दादांविषयीचा आदर होता.


महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार—ते एकदा तरी मुख्यमंत्री व्हावेत, ही कार्यकर्ते, नेते, पत्रकार आणि सर्वसामान्यांची मनापासूनची इच्छा होती. गणित जुळलं नाही, पण भविष्यात नक्की जुळेल अशी आशा होती. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.


आज अजित दादा गुगलवर सर्वाधिक सर्च आहेत, ट्विटरवर ट्रेंडिंग आहेत, इंस्टाग्रामवर व्हायरल आहेत. महाराष्ट्राला अजित दादांना असंच ट्रेंडिंग पाहायचं नव्हतं.

“मी अजित आशाताई अनंतराव पवार… महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो…”

हा व्हिडिओ, हा फोटो, हा मथळा पाहायचा होता.

कारण—

ते कार्यकर्त्यांच्या मनातील मुख्यमंत्री होते,

विरोधकांच्या मनातील मुख्यमंत्री होते,

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री होते,

आणि म्हणूनच—

महाराष्ट्राच्या मनातील

मुख्यमंत्री होते.

साभार :(महेश गलांडे )एबीपी माझा